कत्तलीसाठी गोवंश घेऊन जाताना पिकअप ताब्यात ; गाडी चालकावर गुन्हा दाखल
करमाळा समाचार
कत्तल करण्यासाठी गोवंश घेऊन जाणाऱ्या पिकअप गाडी पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. सदर गाडीतून सहा जर्सी खोंडे व एक जर्सी गाय मिळून आली आहे. या प्रकरणी कर्जत येथील गाडी मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा प्रकार कुंभारवाडा परिसरात घडला आहे. सादिक जाफर कुरेशी रा. कर्जत ता. कर्जत जिल्हा अहमदनगर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की , एका मोबाईल क्रमांकावरून पोलिसांना माहीती देण्यात आली. त्यानुसार शहरातून कुंभारवाडा परिसरात एका गाडीमध्ये गोवंश घेऊन जात आहेत. त्यानुसार करमाळा पोलीस ठाण्याचे हवालदार भाऊसाहेब शेळके, मंगेश पवार, निखील व्यवहारे, हनुमंत भराटे यांचे पथक त्या दिशेने रवाना झाले. यावेळी सायंकाळी सहाच्या सुमारास शहरातील कुंभारवाडा येथे गेल्यानंतर पाहणी केली असता पांढऱ्या रंगाची महिंद्रा बोलेरो पिकअप गाडी (क्रमांक एम. एच. १६ ए.वाय. ४५८६) ही दिसली.

नमूद गाडी तपासल्यानंतर त्यामध्ये एक जर्सी गाय व सहा लहान जर्सी खोंडे असे सात गोवंश दाटीवाटीने कोंबून बांधून ठेवण्यात आले होते. त्यावरून त्यांना कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले. यावेळी गौवंशांना ताब्यात घेऊन करमाळा येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांना कळवले. गाडीचा चालक त्या ठिकाणी उपस्थित नसल्याने गाडीची माहिती घेतली असता सदर गाडी सादिक जाफर कुरेशी यांची असल्याची माहिती मिळाली. त्यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार भाऊसाहेब शेळके हे करीत आहेत.