प्रवाशांच्या जीवाशी खेळ ; बाह्यवळण रस्त्यावर प्रवासी उतरवला चालत जाताना अपघात
करमाळा समाचार
तालुक्यातील जेऊर येथील बस स्थानकात बस उभा करत नसून बाहेरच बाहेर रस्त्यावर प्रवाशांना उतरवले जाते व तिथूनच बस पुढे निघून जाते. यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका असल्याबाबत अनेकदा तक्रारी करूनही बस चालकांना याचे गांभीर्य आल्याचे दिसून येत नाही. त्यातच आज एक अपघात घडल्याने एका प्रवाशाचा पाय तुटला आहे. त्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

टेंभुर्णी नगर महामार्गावर जेऊर गावात रस्त्यापासून एक किलोमीटर अंतरावर बस स्थानक आहे. सदरची बस गावातून न जाता बाह्यवळन रस्त्यावरून थेट करमाळा किंवा टेंभुर्णीच्या दिशेने जाते. त्यामुळे गावातील प्रवाशांना बाहेर रस्त्यावरच उतरावे लागते. त्याचा तोटा प्रवाशांना सहन करावा लागत आहे. यापूर्वीही प्रवासी संघटने कडून बस स्थानकात आणण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु परिवहन खात्याकडून याकडे लक्ष दिले जात नाही.

वरकटणे तालुका करमाळा येथील दशरथ मस्कर हे पंढरपूर या ठिकाणी गेले होते. टेंभुर्णी येथून त्यांनी गाडी पकडली व करमाळ्याच्या दिशेने जाणाऱ्या गाडीतून ते जेऊर पर्यंत आले. चालक आणि वाहक यांनी त्यांना जेऊर येथील बाह्यवळण रस्त्यावर उतरवले. त्या ठिकाणाहून ते चालत जात असताना अनोळखी वाहनाने त्यांना पाठीमागून धडक दिली. यात त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला असून त्यांच्यावर पुढे उपचार सुरू आहेत.