प्रशासकीय इमारतींकडे जाणाऱ्या रस्त्यांचीच दुरावस्था ; बाकी अपेक्षा न केलेली बरी
करमाळा समाचार
करमाळा शहरातील प्रमुख अशा प्रशासकीय परिसरातील रस्त्याची दुरावस्था पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या भागातील सुधारणा व्हावी अशी अपेक्षाच राहणार नाही, अशी परिस्थिती सध्या कचेरी रस्त्याची झाली आहे. विशेष म्हणजे सदरच्या रस्त्यावरून तहसील कार्यालय पोलीस ठाणे न्यायालय व सर्वच प्रशासकीय इमारती असलेला व गजबज असलेला हा रस्ता आहे. तरीही त्या ठिकाणी मोठे खड्डे पडूनही कोणीच लक्ष देत नाही. 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण एवढी तरी अपेक्षा त्यांच्याकडून ठेवू शकतो.

भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उद्या सर्वत्र आनंद उत्सव साजरा होणार आहे. पण 74 वर्ष उलटूनही आपल्याला भौतिक सुविधा मिळाल्या आहेत का ? आपल्याकडे देश पातळी व राज्य पातळीवरील राजकारणाच्या गप्पा मारल्या जातात, पण आज आपल्या भागात ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्यात सुधारणा झाली आहे का ? याकडे कोणाचे लक्षच नसल्याने प्रशासनालाही त्याचे काय घेणेदेणे नाही असे दिसून येत आहे. लोकांनी अपेक्षा करून तक्रारी व अर्ज देऊन काम करून घेण्यापेक्षा संबंधित विभागाने आपापली कामे योग्य पद्धतीने केल्यास लोकांना कोणापुढे हात पसरण्याची गरज पडणार नाही.

लोकांनी केवळ मतदानापुर्ते आपले कर्तव्य बजावयाचे व आपण आपल्याच पद्धतीने व आपल्याच नादात कामे करत राहायची. ज्याच्याकडे साधन संपत्ती आहे तो त्याचा वापर करून व्यवस्थित राहतो व समाजात वावरतो. पण आपल्या सर्वांच्या पैशातून जो कर गोळा केला जातो त्या करातून सरकार व प्रशासन आपल्याला विविध सुविधा देण्यासाठी बांधील आहे. त्या प्रशासनाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात याव्यात अशी सामान्य माणसाची अपेक्षा असते पण तसे होताना दिसून येत नाही.
प्रशासकीय इमारतीकडे जाणारा रस्ता हा इतका खराब झाला आहे की, या ठिकाणाहून मोटरसायकल जाणेही अवघड झाले आहे. या ठिकाणाहून रोज अधिकाऱ्यांच्या गाड्या जातात तरीही अधिकाऱ्यांना ते खड्डे दिसत नाहीत, कारण अधिकारी कधीतरी जात असतात. पण आपल्या सामान्य लोकांना रोज त्यावरून जायचे आहे. कोणीच काही बोलत नाही म्हणून त्या ठिकाणी कामे केली जात नाहीत, अजूनही आपण कोणीच बोलायचं नाही काम होईल तेव्हा होईल त्यातच समाधानी राहायचं.
सदरचा रस्ता विश्रामगृह ते केतुर नाका हा नगरपरिषदेकडे असल्याने त्या कामाचं श्रेय हे नगरपालिकेला दिलं गेलं पाहिजे. पण नगरपालिकेने सदरचे काम करून घेतले पाहिजे यासाठी सक्षम अधिकारी आपल्याकडे असावेत. ज्या प्रांत अधिकाऱ्यांचे सध्या करमाळा नगर परिषदेवर प्रशासक म्हणून नियुक्ती आहे. त्याही याच रस्त्यावरून जातात पण आठवड्यातून एकदाच.. त्यामुळे त्यांना त्या रस्त्याचे गांभीर्य नसावं ही गोष्ट वेगळी. पण जे रोज जातात त्यांनी तरी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
न बोललेलेच बरं…
दत्त मंदिर ते न्यायालय हा रस्ता नेमका कोणत्या विभागाकडे येतो हे त्या विभागांनाच माहीत नाही. या ठिकाणी रस्त्यावर खड्डे व धूळ मोठ्या प्रमाणावर होते याची अनेकदा तक्रारी झाल्या. त्यानंतर तात्पुरती केली जाते. परंतु दत्त मंदिर ते न्यायालय हा रस्ता कोणत्या एका विभागाचा नसून तो मोघमच दुरुस्त केला जातो अशी अवस्था करमाळा तालुक्यातील प्रमुख मार्ग असलेल्या रस्त्याची आहे. त्यामुळे शहरातच अधिकाऱ्यांच्या मार्गाची ही अवस्था आहे. तर ग्रामीण भागातील रस्त्याचं व महत्त्वाच्या कामाचं न बोललेलं बरं…