मकाई विरोधात आंदोलनात बैल, कोंबडी, गाढव आणत थुंकुन निषेध ; बैठकीनंतर २५ पर्यत आंदोलन स्थगीत
करमाळा समाचार
मकाई सहकारी साखर कारखान्याच्या मागील हंगामात थकीत ऊस बिलासाठी बोंबाबोंब आंदोलन व इतर आंदोलन झाल्यानंतर आज पुन्हा संचालक मंडळावर गुन्हे दाखल करून त्यांच्या मालमत्तेवर बोजा चढवण्यासंदर्भात थु थू आंदोलन करण्यात आले. यावेळी पुतळ्याला दिग्विजय बागलांचा चेहरा लावून ” मी भिकारी आहे “असे लिहिण्यात आले होते. तर गाढवाला चेहरा लावून मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान जिल्हाधिकारी यांच्याकडे एक बैठक घेतल्यानंतर आंदोलनकर्ते यांचे शिष्टमंडळ यांनी प्रशासनाला २५ तारखेपर्यंतची मदत दिली आहे अशी माहिती आंदोलनकर्ते ॲड. राहुल सावंत यांनी दिली.

मकाई सहकारी साखर कारखान्याच्या थकीत ऊस बिलासाठी वारंवार करमाळा येथे आंदोलन होत असतानाही त्याचे गांभीर्य घेतले जात नसल्यामुळे आंदोलनकर्ते शेतकरी आक्रमक झालेले दिसून आले. शुक्रवारी पुकारण्यात आलेल्या आंदोलनात बैल, गाढव, कोंबडी व विविध घोषणांचा समावेश झालेला दिसून आला. यावेळी जोपर्यंत सदरचा बोजा व गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत न उठण्याची भूमिका ही आंदोलनकर्त्याच्या वतीने घेण्यात आली होती. तर घटनास्थळी सकाळपासूनच भजन कीर्तन टाळकरी व वारकरी भक्तिमय वातावरणात भजन कीर्तन सुरू होते. त्यामुळे एक प्रकारे आंदोलनाच्या माध्यमातून देवाकडे साकडे मागितले जात असल्याचे दिसून येत होते. हवालदिल शेतकऱ्यांनी आज तहसीलच्या आवारातच भेळ, केळी, कांदा, चटणी, भाकर याचा आस्वाद घेतला. तर आंदोलनाच्या प्रमुख नेत्यांकडून जोपर्यंत सूचना येत नाहीत तोपर्यंत घटनास्थळ सोडले नव्हते. अखेर जिल्हाधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीची माहिती मिळाल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

दरम्यान सोलापूर जिल्हाधिकारी यांच्याकडून मकाई अध्यक्ष यांच्यासह आंदोलनकर्त्यांना बैठकीसाठी बोलण्यात आले होती. या बैठकीत चर्चा करण्यासाठी ॲड. राहुल सावंत,रवींद्र गोडगे,प्रा. रामदास झोळ व दशरथ कांबळे आदिसह काही शेतकरी सोलापूर येथे पोहोचले. त्यांनी जिल्हाधिकारी आशिर्वाद यांच्या सोबत बैठक केली. यावेळी वस्तुस्थिती जिल्हाधिकाऱ्यांना सांगितली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी २५ तारखेपर्यंत कारखान्याला मुदत देऊ त्यानंतर पैसे न जमा झाल्यास त्यांच्यावर कार्यवाही करू असे आश्वासन दिले असल्याची माहिती ॲड. राहुल सावंत यांनी दिली. या आश्वासनानंतर सावंत यांनी करमाळा येथे आंदोलनासाठी बसलेल्या आंदोलनकर्त्यांना उठण्याचा सल्ला दिला. अन्यथा सर्व आंदोलन करते मुलाबाळांसह आंदोलन ठिकाणी रात्रभर ठिय्या मारून बसणार होते.
यावेळी करमाळ्यात ठिय्यासाठी हरिदास मोरे, मोहन पडवळे, ज्ञानेश्वर कावळे, सिद्धेश्वर कावळे, काकासाहेब गपाट, अविनाश पाटील, बाबू वाळुंजकर, पप्पू वाळुंजकर, सुंदर दास काळे, पंढरीनाथ पाटील, दादासाहेब जाधव, संतोष मोरे, प्रकाश पवार, राजेंद्र पाटील, शहाजी माने, दादा साबळे, नितीन सरडे, कांतीलाल पाटील, आबा सरडे, नामदेव सरडे, उमेश सरडे, प्रशांत पोळके, बाळासाहेब रोडे आदिंसह शेतकरी उपस्थित होते.