मंत्र्यांसाठी रस्ते चकाचक होतात “बाप्पा”साठी कमीत कमी खड्डे बुजवा
करमाळा समाचार
आज गणेश विसर्जन असतानाही प्रशासनाला किती गांभीर्य आहे याचे एक जिवंत उदाहरण म्हणजे शहरातील प्रमुख मार्गावर असलेल्या खड्ड्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. सदरचे खड्डे न बुजवताच आजचे विसर्जन पार पडणार आहे. केवळ नियोजनाचा फार्स करून वेळ मारून नेण्याचे काम प्रशासनाकडून केले जात आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे कोण बुजवणार ? याच जागी एखादा मंत्री येणार असता तर लगेचच खड्डे बुजवले गेले असते रंगरंगोटी करण्यात आली असती. त्यामुळेच ‘बाप्पा तू मंत्री असायला पाहिजे होता’ अशी भावना भक्तांच्या मनात निर्माण होत आहे.

करमाळा शहरात तब्बल 31 ठिकाणी गणेश मंडळांनी गणेशाची स्थापना केली होती. लहान मोठे मिळून हेच 50 मंडळांच्या आसपास संख्या जाऊन पोहोचते. बऱ्यापैकी मंडळांनी सातव्या दिवशी गणेश विसर्जन केले. तर अंतिम दिवशी अजूनही मोठ्या प्रमाणावर मंडळ गणेश विसर्जनाच्या तयारीत आहेत. पण प्रशासनाने केवळ मिरवणूक मार्गावरील छोटे-मोठे खड्डे बुजवले. पण शहरातील इतर खड्ड्यांकडे मात्र दुर्लक्ष केले आहे.

महावितरण, बाहेर रस्ता व बस स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठाले खड्डे पडलेले असतानाही त्या ठिकाणी कसलीही डागबुजी करण्यात आली नाही. विशेष म्हणजे करमाळा शहरासह ग्रामीण भागातून याच मार्ग लोक गणेश विसर्जनासाठी करमाळ्यात येतात. तर ज्यावेळी गणेश विसर्जन चालू असते त्यावेळी या प्रमुख मार्गाचा येण्या जाण्यासाठी वापर केला जातो. पण अशा रस्त्यांकडे दुर्लक्ष करून प्रशासन किती गांभीर्याने या विषयाकडे पाहते हे दिसून येत आहे.
एक वेळ गणेश विसर्जन हा उद्देश बाजूला राहू द्या. पण इतर वेळीही बस स्थानक सारख्या महत्त्वाच्या ठिकाणाहून सतत वाहतूक होत असते अशा ठिकाणी एवढा मोठा खड्डा पडल्याने वाहतूक विस्कळीत होते. या ठिकाणी मोठ्या अपघाताची शक्यता आहे. तरीही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. कमीत कमी गणेश स्थापनेच्या निमित्ताने तरी याकडे लक्ष देणे गरजेचे होते. करमाळा परिषदेवर प्रशासक असल्यामुळे त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. परंतु त्यांना कामाचा मोठा व्याप असल्यामुळे छोट्या विषयांकडे लक्ष देणे होत नाही.