सभासदांनो आता तुम्हीच निर्णय घ्या ; जगताप बागलांच्या माघारी नंतर येवलेंचे आवाहन
करमाळा समाचार
आदिनाथच्या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय बागल गटाने दोन दिवसांपूर्वी जाहीर केल्यानंतर ज्येष्ठ नेते, माजी आमदार जयवंतराव जगताप यांनीदेखील या निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता सभासदांसमोर राहिलेल्या पर्यायांमधून आदिनाथच्या भल्यासाठी निर्णय घेणं अधिक सोयीस्कर झाले असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ पत्रकार, मकाईचे माजी संचालक विवेक येवले यांनी व्यक्त केली आहे.

याविषयी बोलताना येवले म्हणाले, २०१७ च्या निवडणुकीत चार गटांच्या लढतीत कुणाला सत्ता मिळाली आणि पुढं काय घडलं हे सर्वश्रुत असल्याने ते उगाळण्याची आता गरज नाही. २२ नोव्हेंबर १९९३ ला आदिनाथ सुरू झाल्यापासून ते कालअखेर या कारखान्यावर सर्वाधिक काळ कुणाचं वर्चस्व होतं, १९९९ साली कर्जमुक्त झालेला आदिनाथ पुढे कुणाच्या मनमानी, घराणेशाहीच्या करणीमुळे गर्तेत आला, आ.रोहित पवारांना हा कारखाना भाडेतत्वावर चालवायला द्यायचा ठराव कोणी केला आणि त्यात पुन्हा कोणीकोणी खोडा घातला, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते गळीत हंगाम सुरू करून केवळ ड्रामेबाजी करून, पुन्हा त्यावर प्रशासक आणून आदिनाथची वासलात कुणी लावली हे सगळं ऊस-उत्पादक, सभासद मतदारांना पूर्णतः ठाऊक आहे.
या पूर्ण कालावधीमध्ये जयवंतराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली २००१ ते २००६ या दरम्यान फक्त पाच वर्षे पूर्ण सत्ता होती. पण सुरुवातीची चार वर्षे त्यांनी त्यांच्या समवेत असलेल्या गोविंदबापू पाटील नंतर मा.आ. रावसाहेब पाटील यांना चेअरमनपदी संधी देऊन त्यांचे हाती कारभार सोपविला होता. त्यानंतर दि.५ मे २००५ रोजी स्वतः जयवंतराव चेअरमन झाल्यानंतर त्यांनी २००५-०६ च्या हंगामामध्ये उसाला सर्वाधिक भाव दिला आणि ऑक्टोबर २००६ च्या निवडणुकीत सहानुभूतीच्या लाटेत आदिनाथवर पुन्हा एकहाती बागल गटाची सत्ता आली आणि त्यानंतरचा आदिनाथचा आजअखेरचा इतिहास हा जगजाहीर आहे.

त्यामुळं आता होत असलेल्या निवडणुकीत रिंगणात
राहिलेल्या नेते व उमेदवारांपैकी कुणाच्या पाट्या कोऱ्या आहेत, कोणत्या नेत्याकडे आदिनाथची गाडी पुन्हा रुळावर आणण्याची क्षमता आहे, कोणता नेता शासनाकडून आदिनाथसाठी निधी मिळवू
शकतो हे सभासदांना नक्कीच ठाऊक असल्याने आतातरी सभासदांनी गटबाजीच्या राजकारणात न अडकता केवळ आदिनाथच्या भल्यासाठी योग्य निर्णय घ्यावा असे आवाहन यावेळी बोलताना येवले यांनी केले आहे.