करमाळ्यातील उपजिल्हा रुग्णालयाला राज्यस्तरीय पुरस्कार ; पटकावला जिल्ह्यात चौथा क्रमांक
करमाळा समाचार – सुनिल भोसले
सन 2019 – 20 चा शासनाचा राज्यस्तरीय कायाकल्प पुरस्कार (उत्तेजनार्थ) उपजिल्हा रुग्णालय करमाळा या संस्थेत जाहीर झाला असून उपजिल्हा रुग्णालय करमाळा या संस्थेने सोलापूर जिल्ह्यात चौथा तर राज्यात 72 वा क्रमांक मिळवला आहे.

सदर पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये व प्रशस्तीपत्रक असे असून तो अंतर्गत व बाहेरील परिसर स्वच्छता, बगिच्या, संस्थेची इमारत, वाहनतळ, रंगरंगोटी, दिशादर्शक, फलक तसेच रुग्णांसाठी माहितीपत्रक, जैववैद्यकीय कचरा, व्यवस्थापन , पेस्ट कंट्रोल, रूग्णांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि इतर अनेक निकषाच्या आधारे दिला जातो.

दि 11 मार्च 2020 रोजी राज्यस्तरीय पथकाने कायाकल्प पुरस्काराचे उपजिल्हा रुग्णालय करमाळ्याचे मूल्यांकन केले होते. या मूल्यांकनाच्या आधारे 75.30 टक्के गुण मिळवून उपजिल्हा रुग्णालय करमाळा यांनी कायाकल्प चा एक लाख रुपयाचा उत्तेजनार्थ पुरस्कार पटकावला आहे. सदर परीक्षणासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढोले पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहन सर यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाची अंमलबजावणी करता उपजिल्हा रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी, परीसेविका, अधिपरिचारिका व वर्ग-4 चे कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.
– डॉ. अमोल डुकरे, वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय करमाळा.