करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

नगरपरिषदेच्या कारवाई पासुन वाचण्याची धडपड अंगलट ; पोलिसात गुन्हा दाखल

करमाळा समाचार 

शहरातील एका विभागाच्या कारवाईवरून वाचण्याच्या नादात दुसऱ्या कारवाईचा सामना करावा लागला आहे. मोकाट जनावरे रस्त्यावर सोडल्याने नगर परिषदेच्या कारवाईच्या भीतीने संबंधित जनावरे एका शेडमध्ये बांधली. तर पोलिसांनी छापा टाकून गुन्हा दाखल केला. त्यामुळे इकडे आड तिकडे विहीर अशी गत करमाळा शहरातील कुरेशी यांची झालेली दिसून आली.

मागील बऱ्याच दिवसांपासून करमाळा शहरात जनावरांची कत्तल बंद करण्यात आली असून या प्रकरणी स्थानिक वादातून प्रत्येक वेळी कोणी ना कोणी यासंबंधी तक्रारी करत आहे. त्यामुळे पोलीसही ॲक्टिव्ह मोड मध्ये आले व त्यांनी कारवाईचा धडाका लावला. वैयक्तिक वादातून सदरचा वाद हा वाढत गेला. यामधून दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी सावध भूमिका येत बैठका व शांतता दोन्हींवर लक्ष दिले.

politics

यामुळे संबंधितांनी सदरच्या जनावरांवर खाण्यात येण्याचा खर्च करण्यापेक्षा त्यांना मोकाट बाहेर सोडून दिले. त्यातून ते बाहेरच काहीतरी खाऊन राहत असताना दिसत होते. त्यामुळे शहरात मात्र सर्वत्र जनावरेच दिसून येऊ लागली. यामध्ये सदर जनावरे फक्त कत्तलीसाठी नसून पशुपालकांनीही ही जनावरे रस्त्यावर सोडण्याचे दिसून आली. त्यामुळे रस्त्यांवर जनावरांचेच राज्य दिसून आले होते. बस स्थानकातही बऱ्याच वेळा तसेच तहसील परिसरात व पोलीस ठाण्यासमोरही जनावरे दिसून येत होती.

करमाळा शहरात मोकाट जनावरांनी धुमाकूळ घातला होता. प्रत्येक ठिकाणी मोकाट जनावरांनी रस्त्यावर कब्जा केलेला दिसून आला. यामुळे त्रासलेल्या करमाळाकरांनी नगरपरिषदेला दोषी धरण्यात सुरुवात केली. यामध्ये काही सामाजिक कार्यकर्ते व राजकीय नेत्यांनीही नगरपरिषदेला सज्जड दम भरला व जनावरे आपल्या खुर्चीला बांधू असा इशाराही दिला. यामुळे नगरपरिषदेने रिक्षा फिरवत तसेच समाज माध्यमांतून सूचना देऊन कारवाईचे सुचना दिल्या.

त्यामुळे घाबरलेल्या संबंधित लोकांनी आपापली जनावरे शोधून त्यांना बांधून ठेवले. तर पुन्हा अशा प्रकारची जनावरे एका व्यक्तीच्या शेडमध्ये असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयाकडे गेली. त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित ठिकाणी जाऊन छापा टाकला. यावेळी त्या ठिकाणी जर्सी गाईची २ खोंडे मिळून आली. त्यामुळे सदरची जनावरे ही कत्तलीसाठी आणल्याचे कारणावरून संबंधितावर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणात नेमकी जनावरे कशासाठी आणली होती याचा शोध पोलिस घेत आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE