संशयीत आरोपीचा निवडणुक प्रचारात मुक्त संचार !! ; चर्चेनंतर अटक – वरदहस्त कोणाचा ?
करमाळा समाचार

निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये विविध प्रकारे चर्चांना उधान आलेले असतानाच पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना घडली आहे. चक्क फरार आरोप संशयित आरोपी हा उमेदवाराचा प्रचार करताना गावात फिरताना दिसून आला. मागील सहा महिन्यांपासून पोलिसांना पाहिजे असलेला आरोपी मुक्तपणे संचार करत असल्याचे पाहून नेमकं करमाळा तालुक्यात चाललंय काय ? हा प्रश्न उपस्थित होत आहे. कोणाच्या वरदहस्ताने संशयित मुक्त संचार करीत होता ? हा प्रश्न आहे.

मुळातच निवडणुकीच्या कार्यकाळात ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, त्यांना पोलिसांनी बोलवून कारवाई करणे अपेक्षित आहे. तशा त्यांना सूचना दिल्या जातात व गरज पडली तर हद्द बाहेर पाठवणे किंवा दिवसभर बसून ठेवणे अशा प्रकारचे कारवाई केली जाते. परंतु मागील सहा महिन्यांपासून फरार असलेला संशयित आरोपी हा उघडपणे गावात प्रचार करताना फिरत असताना देखील त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही हे विशेष आहे.
मागील वर्षी जुलै महिन्यात उजनी धरणातील वाळू उत्खनन केल्याप्रकरणी शब्बीर मुलाणी यांच्यावर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. जवळपास सहा महिन्यापासून संबंधित संशहिताच्या पोलीस तपासात फरार असल्याचे दिसून येत होते. परंतु मिळालेल्या माहितीनुसार काही दिवस बाहेर राहिलेले मुलाणी हे गावातच असल्याचे समोर आले आहे. पण तरीही पोलिसांच्या हाती लागत नसल्याचा खळबळजनक दावा केला जात आहे. विशेष म्हणजे संबंधित मुलाणी हे केम जिल्हा परिषद गटात एका उमेदवाराचा प्रचार करताना उघडपणे फिरताना दिसत आहेत.

यावर चर्चा सुरू झाल्यानंतर पोलिसांनी घाई गडबडीत संबंधित संशयित आरोपीला अटक केल्याची माहीती मिळत आहे. प्रश्न असा पडतो की मागील तीन ते चार दिवस प्रचारात फिरत असताना तो गावात मुक्तपणे संचार करत आहे. हे पोलिसांना कळाले नाही की जाणून-बुजून दुर्लक्ष केले गेले ? हा मोठा प्रश्न आहे. सामान्य गुन्ह्यात दाखवली जाणारी तत्परता या ठिकाणी का दिसून आली नाही हा मोठा प्रश्न आहे.

