कोविड हॉस्पिटल तक्रारीसाठी तहसिलदार माने यांनी घेतली कडक भुमीका
करमाळा समाचार
शासनाने मंजुरी दिलेल्या कोविड हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी दिलेल्या बिलासंदर्भात रुग्णांच्या तक्रारी असतील तर त्या लिखित स्वरूपात तहसील कार्यालयात किंवा रुग्णालय बिल तपासणी समितीचे अध्यक्ष तथा सहाय्यक निबंधक दिलीप तिजोरे यांच्याकडे द्याव्यात असे आव्हान आपत्तीकालीन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा करमाळ्याचे तहसीलदार समीर माने यांनी केले आहे. तसेच अनाधिकृतपणे कोविंड सेंटर चालवत असेल तर त्याच्यावर धडक कारवाई करू असा इशाराही तहसीलदार समीर माने यांनी दिला आहे.

कोरोना पेशंट कडून लाखो रुपये उकळले जात असून त्यांना दवाखाने व मेडिकल अधिकृत बिल दिले जात नाही. काय उपचार केले याची माहिती दिली जात नाही अशा तक्रारी वाढत असल्याने शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी याबाबत तक्रार केली होती. याबाबतचा सविस्तर अहवाल तालुका वैद्यकीय अधिकारी अमोल डुकरे तहसीलदार समीर माने यांच्याकडे देणार आहेत.
रुग्णालयातून आकारलेली बिले योग्य आहे का नाहीत हे तपासण्यासाठी एक शासकीय समिती नेमलेली आहे. पण या शासकीय समितीला केराची टोपली दाखवत हॉस्पिटल मनमानी कारभार करत आहेत. एखादा पेशंट किंवा त्याचे नातेवाईक यांनी गोंधळ घातला तर तडजोड करून कमी रक्कम देऊन विषय जागच्या जागी संपवला जातो.

बील समितीच्या अध्यक्षांच्या भूमिकेकडे लक्ष..
रूग्णालय बिल समितीचे अध्यक्ष सहाय्यक निबंधक दिलीप तिजोरी आहेत. यात पाच शासकीय अधिकारी सदस्य आहेत. आता या प्रकरणात हे अधिकारी प्रत्येक रुग्णालयात जाऊन माहिती घेऊन कारवाई करणार का ? हा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून विचारला जात आहे.
तसेच बिलासंदर्भात तक्रारी आहेत अशांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयात तक्रारी संबंधीत अधिकार्याकडे पाठवाव्यात असे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.