करमाळ्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट ; कारवाईत पाच पैकी एकच हाती
प्रतिनिधी | करमाळा
तालुक्यात बोगस डॉक्टरांची माहिती मिळाल्यानंतर या डॉक्टरांवर कारवाई करायला गेल्यानंतर एक जण हाती लागला तर इतर चार जण फरार झाले आहेत. सदरच्या बोगस डॉक्टरांकडे पदवी किंवा परवाना नसताना हे ग्रामीण भागातील रुग्णांना तपासणी करत असल्याबाबत आरोग्य विभागाच्या पथकाने दि १२ रोजी कारवाई केली तर १७ तारखेला अहवाल गटविकास अधिकारी यांच्याकडे दिला. त्यानंतर सदरची कारवाई करण्यात आली.

तर समीतीतील पथकातील कारवाई करताना हलगर्जी केल्याने आरोग्य विभागातील ‘त्या’ कर्मचाऱ्यांवर त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. उज्वल प्रफुल्ल दास (वय ३८) रा. पोतापनगर, पश्चिम बंगाल सध्या रा. केडगाव ता. करमाळा ताब्यात घेण्यात आलेल्या एका संशयित बोगस डॉक्टरचे नाव आहे.
तालुक्यातील पंचायत समितीच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना तालुक्यात बोगस डॉक्टरांची माहिती घेऊन कारवाई करण्याबाबत एका समितीची नेमणूक करण्यात आली होती. त्या समितीने शोध घेतला असता दि १२ मार्च रोजी केडगाव सह पाच ठिकाणी वेगवेगळी बोगस डॉक्टर हे सेवा देत असल्याचे दिसून आले. त्या समितीने याबाबतचा अहवाल दि १७ रोजी करमाळा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मनोज राऊत यांच्याकडे दिला. त्यानंतर राऊत यांनी पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे व आरोग्य अधिकारी श्रद्धा भोंडवे, ग्रामसेवक समाधान कांबळे व सचिन ओहोळ या सर्वांना सोबत घेऊन संबंधित ठिकाणी बोगस डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी पथक रवाना झाले.

यावेळी सुरुवातीला केडगाव ता. करमाळा येथे नदी कडे जाणाऱ्या रोडवर स्टॅन्ड जवळ एका ठिकाणी दवाखाना असे लिहिलेला फलक दिसला. पण त्यावर कोणतीही डिग्री लिहिलेली नव्हती. त्यावरून आत पाहिले असता तर एक बोगस काही रुग्णांना तपासत होता. या वेळी त्याच्याकडे विचारपूस केली असता तो योग्य पद्धतीने उत्तरे देऊ शकला नाही. या वेळी त्याच्या पुढील इंजेक्शन, सलाईन व इतर साहित्य असल्याचे दिसून आले पण त्याच्या कडे परवाना किंवा प्रमाणपत्र काहीच नव्हते. यावरून त्याची तक्रार करमाळा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक मनोज खंडागळे हे करीत आहेत.
बोगस डॉक्टर वर कारवाई करताना त्याठिकाणी लोकांनी विरोध केला त्यावेळी संबंधित गावात आरोग्य विभागाची यंत्रणा कमकुवत असल्याच्या तक्रारी आढळल्या त्यावरुन प्रशासक कालावधीत आरोग्य यंत्रणेत सुधारणासाठी निधी उपलब्ध करुन कर्मचारी वाढ तसेच केडगाव येथे सोमवार पासुन डॉक्टर देत आहोत. शिवाय कारवाई वर शंका उपस्थित केल्याने चौकशी करुन योग्य ती कारवाई केली जाईल. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समितीने केलेल्या कारवाई वर शंका उपस्थित झाल्याने त्याबाबत योग्य ती कारवाई केली जाईल.
– मनोज राऊत, गटविकास अधिकारी, करमाळा.