जरांगे फॅक्टर सोबत जात अपयश पचवलेले झोळ बीजेपीच्या वाटेवर
करमाळा समाचार
दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ हे लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे. प्रा. रामदास झोळ यांनी करमाळा विधानसभा निवडणूक अपक्ष लढविली होती. त्यात सुरुवाती पासुन जरांगे यांचा आपल्याला पाठिंबा व जरांगे यांची पसंती आपल्याला असल्याचे दाखवत मते मिळवण्याचा प्रयत्न केला पण प्रा. झोळ यांना अपेक्षीत असे मतदान त्यांना पडले नव्हते. २०२४ विधानसभा निवडणूकीत केवळ ४७६३ मते झोळ यांना मिळाली होती.

करमाळा विधानसभा मतदारसंघात विधानसभा सदस्य होण्याची महत्त्वकांक्षा बाळगून असलेले दत्तकाला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यांनी विधानसभा निवडणूक अपक्ष लढवली होती. यावेळी महाराष्ट्रात गाजत असलेल्या जरांगे फॅक्टरचा लाभ उचलण्याचा त्यांचा मनसुबा होता. परंतु सदर निवडणुका दरम्यान जरांगे यांनी कोणत्याही नेत्याला पाठिंबा देण्याचं टाळले. त्याचा सर्वात मोठा फटका झोळ यांना करमाळा तालुक्यातून बसल्याचा दिसून आले. शिवाय अंतिम टप्प्यापर्यंत झोळ हे जरांगे यांच्या संपर्कात होते. परंतु मतदारांनीही त्यांना नाकारल्याचे स्पष्ट दिसून आले आहे.
आता झोळ यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असला तरी याचा तालुक्याच्या राजकारणात अपेक्षित असा परिणाम होताना दिसणार नसला तरी भाजपा मात्र त्यांच्या प्रवेशाचा लाभ उचलू शकते. दत्तकला शिक्षण संस्था व विविध ठिकाणी शिक्षण क्षेत्रात प्राध्यापक रामदास झोळ यांचं मोठे वजन आहे. त्याच्या माध्यमातून पदवीधर तसेच शिक्षक मतदार संघात झोळ यांचा वापर केला जाऊ शकतो. झोळ यांचा प्रवेश हा तालुक्यातील मोठ्या घडामोडी घडवणारा नसून भाजपा व महायुतीसाठी फायद्याचा ठरू शकतो असे दिसुन येत आहे.

झोळ यांच्या सुरुवातीच्या काळापासून त्यांच्या सोबत राहिलेले शेतकरी कामगार संघटनेचे अध्यक्ष दशरथ कांबळे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदस्य झोळ यांच्या प्रवेशानंतर कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागून राहणार आहे. मुळातच तालुक्याचे राजकारण हे पक्षीय होत नसून गटातटावर अवलंबून असल्याने पक्षीय राजकारणात वाव मिळत नाही. येणाऱ्या काळामध्ये झोळ यांची कोणासोबत राहिल किंवा ते स्वतंत्र काम करतील यावर तालुक्यातील चित्र स्पष्ट होणार आहे.