शिवसेनाफुटी नंतर विधानसभेची पहिलीच निवडणुक – बागलांसह मुख्यमंत्री शिंदेसह शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला
करमाळा समाचार
विधानसभा मतदारसंघात शिवसेनाचा छुपा मतदार असून जवळपास दोनदा शिवसेनेचा आमदार तर इतर वेळी शिवसेनेच्या पाठिंब्यावर या ठिकाणी आमदार होताना पाहिले आहे. माजी आमदार नारायण पाटील यांनी शिवसेना सोडल्यानंतर बागल यांनी शिवसेनेत प्रवेश केला व अचानक झालेल्या प्रवेशामुळे तसेच पाटील यांच्यासोबत असलेल्या गैरसमजामुळे शिवसेनेला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. आता शिवसेना (शिंदे गट) नव्या जोमाने पुन्हा उभा राहिलेली दिसत आहे.
तालुक्यातील शिवसेना उमेदवारीची प्रबळ दावेदार असून शिवसैनिकांना संधी मिळाली पाहिजे असा दावा करीत शिवसेनेने सदरची जागा स्वतःकडे खेचून आणली. माजी आमदार नारायण पाटील यांनी शिवसेनेतून विधानसभेवर विजय मिळवल्यानंतर शिवसेनेतूनच त्यांना तिकीट नाकारण्यात आले. त्यांनी अपक्ष उभा राहत आपली स्वतःच्या गटाची ताकद दाखवून दिली व तालुक्यातील पहिल्या क्रमांकाची मते मिळवली होती. त्यावेळी शिवसेनेच्या तिकिटावर उभा असलेल्या रश्मी बागल यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.
आता मित्र पक्षांसोबत संघर्ष करीत सदरची जागा ही शिवसेनेला सुटावी यासाठी शिवसैनिकांनी जीवाचे रान केले आणि युवक नेत्याला संधी देत सर्वत्र उत्साह निर्माण केला आहे. महायुतीतील तीनही पक्षांच्या संख्याबळावर येणारा मुख्यमंत्री ठरू शकतो. त्यामुळे शिंदे गटाच्या प्रत्येक जागेला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी करमाळ्यातील जागेसाठी स्वतः जाहीर सभा घेणार आहेत सदरची सभा दि ८ रोजी यशवंतराव चव्हाण महाविद्यालौ मैदानावर आहे. यावेळी सर्व मित्र पक्ष व स्थानिक गटातटाच्या नेत्यांना सोबत घेणे हे एक प्रकारे आव्हान असणार आहे.
महिला नेत्या रश्मी बागल सध्या भाजपाच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या माध्यमातून भाजपा तर उमेदवार दिग्विजय बागल, महेश चिवटे, प्रियंका गायकवाड यांच्या माध्यमातून शिवसेना सोबत घेऊन शिवसेना सर्वांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. करमाळा तालुक्यासह छत्तीस गावातही प्रतिसाद चांगला मिळत असून याचा मतात किती रूपांतर होतोय यावर शिवसेनेचे तालुक्यातील भवितव्य अवलंबून राहणार आहे. ज्या पद्धतीने शिवसैनिक पदाधिकारी दावा करून जागा मिळवत आहेत, त्या पद्धतीने मत मिळवून त्यांना वरिष्ठांना स्वतःचे अस्तित्व दाखवावे लागणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या फुटीनंतर विधानसभेची पहिलीच निवडणुक असुन आता बागलांच्या (शिंदे गट) प्रतिष्ठेचा विषय झाला आहे.बागलांसह मुख्यमंत्री शिंदेसह शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.