वाळु माफियाने पाण्यात ठेवलेले देव पाण्यातच बुडाले ; बदलीमुळे तहसिलची चिंता मिटली तर शहराची वाढली
करमाळा समाचार – नाना घोलप
लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सध्या बदलांचे वारे सुरू आहे. बऱ्याच काळापासून कार्यरत असलेले अधिकारी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पाठवले जात आहेत. त्यामुळे तालुक्यातून पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्यानंतर आता मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांची बदली झाली आहे. तर तहसीलदार म्हणून शिल्पा ठोकडे यांना कायमचा पदभार देण्यात आला आहे.
तहसीलदार समीर माने यांची बदली झाल्यानंतर करमाळाचे तहसीलदार पद अनेक दिवस रिक्त होते. तर याचा पदभार हा नायब तहसीलदार विजयकुमार जाधव यांच्याकडे सोपवण्यात आला होता. त्यानंतर या पदावर तात्पुरता पदभार श्रीमती शिल्पा ठोकडे यांना देण्यात आला होता. पण नुकताच त्यांना कायमस्वरूपी हाच पदभार देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. सुरुवाती आल्यापासून त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवून दिलेली आहे. त्यांच्या या कायमच्या पदभारामुळे वाळू माफियांमध्ये मात्र दहशत निर्माण होण्याची शक्यता आहे. शिल्पा ठोकडे यांची नियुक्ती झाल्यापासूनच वाळूमाफ्यांमध्ये त्यांची दहशत आहे. त्यांची बदली व्हावी किंवा होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यासाठी अनेकांनी पाण्यात देवही ठेवले होते. अखेर ते देव बुडाले पण श्रीमती ठोकळे यांची बदली मात्र झाली नाही.
तर करमाळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांची सहाय्यक आयुक्त सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका येथे नियुक्ती करण्यात आली आहे. ते करमाळा येथे कार्यरत असताना वरिष्ठ पदासाठी इतर परीक्षा देत असल्याची माहिती होती. त्यासाठी त्यांनी प्रयत्नशील होते. आत्ता त्यांची बदली झाली असली तरी त्यांच्या जागी अद्यापही कोणाची नियुक्ती करण्यात आलेली नाही किंवा पदभार देण्यात आलेला नाही. त्यामुळे पुन्हा सदरचा पदभार हा कुर्डूवाडी येथील मुख्याधिकारी यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे.
कायमचा पदभार दिल्याने करमाळा तहसील चा कारभार आता सुरळीत होऊन चुकीच्या कामांना आळा बसेल. यामुळे तहसीलची चिंता मिटली.. पण नगर परिषदेकडे अद्यापही अधिकारी दिला नसल्याने त्या ठिकाणी मात्र चिंता वाढणार आहे. मुळातच करमाळा नगर परिषदेवर प्रशासक म्हणून आधीच प्रांत यांच्याकडे कारभार देण्यात आलेला आहे. प्रमुख अधिकारी नसल्याने या ठिकाणचा कारभार रामभरोसे होऊ नये याची चिंता वाढली आहे.