साडे चार कोटींचा रस्ता पंधरा दिवसात उचकटला ; रस्त्यावर खड्डे डागडुजीने भागवाभागवी
करमाळा समाचार
तालुक्यातील प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची दुरावस्था झाली असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात गावकऱ्यांनी तात्काळ तक्रार केली असताना केवळ सदरच्या रस्त्याची डागडुजी केली जाणार आहे. केवळ पंधरा दिवसात सदरचा रस्ता उचकटत असेल तर येणाऱ्या पाच वर्षात रस्त्याची काय अवस्था होईल असा प्रश्न ग्रामस्थ विचारू लागले आहेत.

करमाळा तालुक्यातील प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून करमाळा ते हिवरवाडी, वडगाव (द), रावगाव, वंजारवाडी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करण्याचे काम सुरु आहे. सदरचा रस्ता हा ७ किमी अंतर असून ४६२ लक्ष रुपये खर्च करून या रस्त्याचे काम केले जात आहे. पाच वर्षे देखभाल व दुरुस्ती केली जाणार आहे.

सदरच्या कामाची मुदत बारा महिन्याची असून हे काम नोव्हेंबर महिन्यात पूर्ण केले जाणार आहे. आतापर्यंत जेवढा रस्ता झाला आहे. त्या रस्त्याची परिस्थिती अत्यंत खराब व निकृष्ट दर्जाचे असल्याने परिसरातील ग्रामस्थांनी या कामाला विरोध केला आहे. तरीही प्रशासनाच्या वतीने लोकांच्या तक्रारींना केराची टोपली दाखवली जात आहे व तसेच लोकांवर ते काम लादले जात आहे. ज्या ठिकाणी खड्डे व भेगा पडल्या आहेत त्या ठिकाणी तात्पुरती मलमपट्टी केली जात आहे.
पण काम सुरू असतानाच छोट्याशा पावसाने ही अवस्था होत असेल तर येणाऱ्या काळात या रस्त्याचे काय होईल असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. सदर निवेदनावर संदीप काळे, अविनाश गायकवाड, केतन गायकवाड, विलास वाळुंजकर, सचिन काळे यांच्यासह गावकऱ्यांच्या सह्या आहेत.