अपहारावर झाला शिक्कामोर्तब फौजदारीचे आदेश ; एक सरपंच दोन ग्रामसेवक गोत्यात
करमाळा समाचार
जेऊर ग्रामपंचायतीने शासनाचे जागेत बेकायदा व्यापारी गाळे बांधून बेकायदेशीर वाटप केले. त्याबाबत झालेल्या अपहराची रक्कम तत्कालीन सरपंच संगिता साळवे व ग्रामसेवक एन एस लपाटे व श्री. ए. एम. माने यांचेकडून वसूल करून घ्यावी व त्यांचे विरूध्द फौजदारी गुन्हा दाखल करा असा आदेश मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी गटविकास अधिकारी श्रीकांत खरात यांना दिले आहेत.

जेऊर ग्रामपंचायतमध्ये बेकायदेशीररित्या व्यापारी गाळे बांधून बेकायदेशीरित्या जादा पैसे घेऊन वाटप केले. तसेच आठवडा बाजार व घरपट्टी, पाणी पट्टी यातील अपहराची चौकशी करावी अशी मागणी बालाजी गावडे, बाळासाहेब करचे व देवानंद पाटील यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी यांचे कडे केली. त्याची वेळेत चौकशी होत नसल्याने या तिघांनी सन २०१८ मध्ये पंचायत समिती समोर ९ दिवस उपोषण केले.
चौकशीअंती पुणे आयुक्तांनी ग्रामपंचायत कार्यकारीणी बरखास्त केली. पुढे त्यावर उच्च न्यायालयात अपील दाखल केले. त्यात आयुक्तांचे आदेशाला स्थगिती दिली. तरीही तक्रारकर्ते अपहराची रक्कम वसुलीसाठी प्रयत्नशिल होते. त्यानुसार गटविकास अधिकारी आर.एम.साळुंखे यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक झाली. त्यांनी चौकशी करून संबंधितांकडून अपहराची रक्कम वसुल करून घ्यावे असा अहवाल दिला. त्यानंतर पुर्वी दिलेल्या आदेशानुसार गटविकास अधिकारी यांनी संबंधिताचे म्हणणे घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कडे पाठवले होते. सदरचे खुलासे मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी नामंजूर करून संबंधितांकडून अपहराची रक्कम वसुल करून त्यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल करावा असे आदेश दिले आहेत.
