पावसाच्या पाण्यात खड्डे बुजवण्याचे काम सुरु ; संबंधित विभागाचे दुर्लक्ष
करमाळा समाचार
पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या दिंड्यांचे आगमन होण्यासाठी केवळ एक दिवस बाकी असताना रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी पाऊस झाल्यामुळे खड्ड्यांमध्ये पाणीही काढले जात नाही. त्यामध्येच खडी व डांबर टाकून खड्डे बुजवण्यात येत आहेत. सदरचे निकृष्ट दर्जाचे काम केले जात असताना ते काम किती दिवस टिकेल हा मोठा प्रश्न आहे.

टेंभुर्णी – करमाळा – जातेगाव या मार्गावरील वेळोवेळी खड्डे बुजवण्यासाठी लाखोंचा निधी खर्चला जातो. पण खड्ड्यांची स्थिती कायम तसेच राहत आहे. नुकतच दिंड्यांच्या आगमनापूर्वी सदरचे खड्डे बुजवण्याचे काम घेण्यात आले आहे. पण तरीही ते खड्डे नीट बुजवले जात नसल्याचे दिसून येत आहे. मागील दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. त्या पावसाचे पाणी सदरच्या खड्ड्यांमध्ये साचलेले असताना पाणी बाहेर न काढता खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे.

सदरचा खड्डा तात्पुरता बुजवला जाईल पण ते केलेले काम किती दिवस टिकेल ? लोकांचा पैसा असाच पाण्यातून वाहून जाऊन देणार का, थोड्या दिवसानंतर पुन्हा हेच खड्डे बुजवायला दुसरे टेंडर काढण्याची शक्यताही नाकारता येत नाही. म्हणून आत्ता सुरू असलेले कामावर संबंधित विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे