प्रेमात पळुन आलेल्या मुलीवर वेड्यासारखे फिरण्याची वेळ ; करमाळा पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुलगी सुखरुप घरी
समाचार टीम –
आज-काल प्रेम प्रकरणे भलतेच वाढून रोज नवनवीन ठिकाणाहून अल्पवयीन मुली मुले पळून जाताना दिसून येत आहेत. अनेकांना समाजात काय चालू आहे. समाजात होत असलेली फसवणुकीची समज नसते. तर कोणाचे प्रेम आंधळे असते अशा परिस्थिती मुले मुली घर सोडून जातात. पण पुढे काय हा प्रश्न त्यांना कधी पडलेला नसतो. यातून ते आपले नुकसान करतात हे त्यांच्या उशिरा लक्षात येते. उशिरा का होईना लक्षात येते पण खुप उशीर झालेला असतो. पण याप्रकरणात करमाळा पोलिसांच्या सतर्कतेमुळे एक मुलगी आपल्या घऱी सुखरुप गेली आहे.

नाशिक जिल्ह्यातील म्हसरुळ जिल्हा नाशीक येथील एक अल्पवयीन मुलगी जेमतेम पंधरा वर्षाची. नुकतीच दहावी ही झालेली नसेल अशी ही मुलगी एका मुलाच्या प्रेमात पडली. दोघांनी प्रेमाच्या शपथा घेतल्या. आयुष्यभर सोबत राहण्याची ठरवले व प्रेम संबंध रंगात आले. मुलगी अल्पवयीन असल्याने तिला तर समज नव्हतीच. पण मुलालाही पुढे काय करायचे याची माहिती नव्हती. पण त्या दोघांचं प्रेम आणि जोमात आले होते.

एके दिवशी दोघांनीही घर सोडून जायचे ठरवले. 19 मे रोजी ते दोघेही घरातून बाहेर पडले. घराबाहेर जाताना थोडेसे पैसे व काही वस्तू सोबत घेतल्या होत्या. जवळपास दोन ते तीन महिने असेच ते भटकत राहिले. या गावाहून त्या गावाला फिरत राहिले. फिरता फिरता ते उपाशी तापाशी राहू लागले असे असताना मुलाला लक्षात आले की आपण काहीतरी मोठी चूक केली आहे. बाहेर तर आणली आता सांभाळायचे कसे. हा मोठा प्रश्न त्याला पडू लागला. त्यामुळे संधी साधून त्यांनी अचानक तिला एकटीला सोडले व पळून गेला.
ही बिचारी तिच्या भरोशावर घरदार सोडून बाहेर आली होती. आई बापाला सोडून त्याच्यासोबत राहण्याची स्वप्न बघत होती. कोणत्या तोंडाने घरी जायचं ? कसा संपर्क साधायचा, चूक झाली असं कसं सांगायचं. या प्रश्नात ते बिचारी अजूनही एकटीच फिरत होती. या गावाहून त्या गावावर जात होती, मिळेल ते खात होती. अशा परिस्थितीत वेडी समजून तिला कोण जवळही करत नव्हते. कसं बस ती दिवस घालवत होती. आपल्या गावाकडे माघारी कसं जायचं हेही तिला कळत नव्हते. अखेर ती करमाळ्यात पोहोचली.
करमाळ्यात आल्यानंतर पोथरेनाका येथे काही नागरिकांनी तिला पाहिले. त्यांनी लागलीच करमाळा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या मुलीला आणण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक विनायक माहुरकर व पोलीस महिला कॉन्स्टेबल शितल पवार यांना त्या ठिकाणी धाडले. त्यांनी त्यांची कामगिरी चोख बजावली. त्या मुलींचा शोध घेऊन तिला घेऊन आले. तिला माहिती विचारल्यानंतर तिने प्रेमात एका मुलासोबत घर सोडले ते सांगितले. पण आता कोणत्या तोंडाने माघारी जाऊ तिला सुचत नव्हते.
त्यानंतर करमाळा पोलिसांनी तिला नाव व पत्ता विचारला तिचा पत्ता घेऊन संबंधित पोलीस ठाण्यात चौकशी केली. तिथे त्या ठिकाणी तिला कोणीतरी अनोळखी व्यक्तीने पळून नेले म्हणून गुन्हा दाखल होता. तिचे कुटुंबीय ही शोध घेत होते. अखेर तिथल्या पोलीस ठाण्याचा संपर्क करून करमाळा पोलिसांनी त्या पोलिसांना करमाळ्यात बोलवले व त्या मुलीला त्यांच्या स्वाधीन केले.
करमाळा पोलिसांच्या या सतर्कतेमुळे आज एक मुलगी आपल्या आई-वडिलांपाशी माघारी गेली आहे. पण अल्पवयीन असो या किंवा अठरा वर्षांपुढील मुला-मुलींनी प्रेमात पडण्याआधी कमाई कडे लक्ष दिले पाहिजे. आयुष्यात प्रेमाने घर चालत नाही तर घर चालवण्यासाठी पैसा लागतो आणि पैसा कमावणारा कोणीतरी घरात असला म्हणजे संसार टिकतो. त्यामुळे मुलींनी आवर्जून या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे