दहा दिवस पाणी चालु होते तेव्हा काय करत होतात – ननवरे ; सीना काठचे शेतकरी आक्रमक
करमाळा समाचार
सीना – कोळगाव धरणातील पाणी कालव्याद्वारे साकत मध्यम प्रकल्पात सोडण्यात आल्यानंतर सीना कोळगाव धरण परिसरातील शेतकरी आक्रमक झाले होते. यासाठी बुधवारी दि १९ रोजी शेकडो शेतकऱ्यांनी धरण क्षेत्राजवळील परांडा ते सोनारी रोडवर हरणवडा येथे रास्ता रोको व जलसमाधी आंदोलन ही केली. त्यावेळी सोडलेले पाणी बंद करण्यात आले होते. त्यानंतर पाणी बंद करण्यावर श्रेयवाद होत असल्याचा आरोप बोरगावचे युवा नेते विनय ननवरे यांनी केला आहे.


पाणी बंद करावे या मागणीसाठी शेतकरी संघटना परांडा यांच्या वतीने रास्तारोको करण्यात आले होते. सदरील साकत तळ्यात अनाधिकृत पणे १० दिवसा पासून पाणी चालू होते. सदरचे पाणी त्याभागातील स्थानिक आमदाराच्या दबावाने पाणी चालू होते. त्यावेळी आपले लोकप्रतिनिधी यांनी 10 दिवसात एक शब्द काढला नाही आणि आता श्रेय घेण्यासाठी पुढे आलेत. या रस्ता रोको साठी बोरगाव, दिलमेश्वर, करंजे येथून निलेश पाटील, जयसिंग घाडगे, केशव ढवळे, नाना भोगल,, पप्पू ढवळे, प्रहार संघटना या युवकांच्या पुढाकाराणे आम्ही सर्व गावकरी सहभागी झालो असेही ननवरे म्हणाले.
तर ज्या वेळी रस्तारोको चालू होता त्यावेळी जोपर्यंत पाणी बंद होत नाही तोपर्यंत शेतकरी रस्त्या वरून उठण्यास तयार नव्हते. तसेच काही शेतकरी जलसंमाधी घेत होते या दबावाने स्थानिक प्रशासनाने पाणी बंद करण्याचा निर्णय घेतला. हा विजय शेतकऱ्याचा आहे. जर लोकप्रतिनिधी ना एवढीच शेतकऱ्याची काळजी असेल तर येथून पुढे पाण्याचा एक थेंब धरणातून खाली जाऊन देऊ नये असे विनय ननवरे यांनी सांगितले.