शिवभक्तांच्या आवाहनाला तालुक्यातुन १०० टक्के प्रतिसाद
करमाळा समाचार
छत्रपती शिवाजी महाराज व इतर महापुरुषांवर बदनामीकारक व इतिहासाची छेडछाड केल्याप्रकरणी तसेच केलेल्या वक्तव्यांचा करमाळ्यात निषेध व्यक्त करीत करमाळा बंदची हाक देण्यात आली होती. यावेळी शहर मर्यादित हा बंद पुकारण्यात आला होता. मात्र तालुक्यातील ग्रामीण भागांनाही या प्रतिसाद देत सर्वच गावांनी बंद पाळला आहे. आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून शहरातील सर्व पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.

करमाळा तालुक्यातील सर्वपक्षीय संघटना, आर पी आय, मुस्लिम संघटना, संभाजी ब्रिगेड यासह सर्वच सामाजिक संघटनांनी आजच्या बंदला जाहीर पाठिंबा दिला आहे. शहरातील व्यापाऱ्यांनीही सदरच्या बंदला पाठिंबा दिल्याने शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे. सकाळी दहाच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सर्व शिवभक्तांनी गोळा होत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून शहरातून एक रॅली काढली. त्यामध्ये सर्व महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.

महाराष्ट्रामध्ये सध्या राजकीय स्थीरतेचे भान कोणालाच राहिले नसून त्यामध्ये संविधानिक पदावर असलेले राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल वारंवार अपमान जनक वक्तव्य करून महाराष्ट्रामध्ये वाद-विवाद व सामाजिक अस्थिरता निर्माण करण्यास कारणीभूत असणाऱ्या भगतसिंह कोशारी राज्यपाल पदावरून हकालपट्टी करण्यात यावी.
भाजपा प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी, प्रसाद लाड, रावसाहेब दानवे, मंगल प्रसाद लोढा यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व त्यांना महाराष्ट्रात फिरण्यास मनाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आले होती. त्या अनुषंगाने आज बंद पाळण्यात येत आहे. यावेळी संबंधितांच्या विरोधात घोषणाही देण्यात आल्या. पोलिस प्रशासन सतर्क असुन बंद ला शांततेत सुरुवात झाली आहे.