जरांगेंच्या आगमनासाठी ८०० स्वयंसेवक सज्ज ; मैदान तयार – या भागात उस वाहतुक बंद
करमाळा समाचार
मराठा आरक्षणासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा दौरा १५ पासुन सुरुवात होत आहे. यामध्ये करमाळा तालुक्यातील वांगी क्रमांक एक येथे सदरचे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. १६१ एकर क्षेत्रावर सदरची सभा होत असून तिथपर्यंत पोहोचण्यासाठी नव्याने सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. सर्व काम अंतिम टप्प्यात आले असून ५० हजार पेक्षा जास्त मराठा बांधव या ठिकाणी उपस्थित राहतील अशी शक्यता आयोजकांच्या वतीने व्यक्त करण्यात आले आहे.

उजनी जलाशयाच्या कडेला भीमा नदीचे च्या परिसरात सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सदरच्या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी याआधी रस्ता नव्हता. पण केवळ तीन दिवसात नव्याने रस्ता तयार करण्यात आला आहे. याठिकाणी मराठा बांधवांसह इतर समाजाच्या बांधवांचे सहकार्य लाभत आहे. याठिकाणी पार्किंगच्या व्यवस्थेशिवाय ॲम्बुलन्सची सोय करण्यात आली आहे. तालुक्यात आवाहन केल्यानंतर तब्बल ८०० स्वयंसेवकांनी स्वयंस्फुर्तीने सहभाग दाखवला आहे. तर यांच्या माध्यमातून सर्व देखरेख केली जाणार आहे.

यावेळी परिसरातील सर्व ऊस वाहतूकदार ट्रॅक्टर व ट्रक चालक मालक वांगी नंबर १ व पंचक्रोशीतील वाहतूकदार ठेकेदार यांना महत्वाची सुचना केली आहे. या सभेच्या दिवशी दुपारी १२ वाजल्या पासून ते रात्री १२ वाजेपर्यंत ऊस वाहतूक पुर्ण पणे बंद ठेवण्याची सुचना आलेली आहे. तरी ऊस वाहतूकदार ट्रॅक्टर व ट्रक चालक वांगी नंबर १ व परीसरातील लोकांनी याची नोंद घ्यावी. वांगी ते शेलगाव रस्ता व वांगी ते पांगरे या मार्गावरील रस्ता ऊस वाहतूक पुर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे.