करमाळासोलापूर जिल्हा

सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्र शाखा करमाळा यांच्या वतीने गटविकास अधिकारी यांना निवेदन सादर

करमाळा – संजय साखरे 

पंधराव्या वित्त आयोगाच्या रकमेतुन स्ट्रीट लाईट व पाणी पुरवठा योजनेचे बिल न भरणे तसेच ग्रामपंचायतसाठी कर वसुलीसाठी नियुक्त केलेल्या एजन्सी ऐवजी स्थानिक कर सल्लागार यांच्याकडुनच ही कामे करून घ्यावीत व सदरील एजन्सीचे काम रद्द करण्यात यावीत अशा मागणीचे लेखी निवेदन करमाळाचे प्रभारी गटविकास अधिकारी राजाराम भोंग यांना सरपंच परिषदेचे तालुका समन्वक राजुरीचे सरपंच डॉ अमोल दुरंदे , सावडीचे सरपंच भाऊसाहेब शेळके , वरकटणेचे सरपंच भगवान तनपुरे यांनी दिले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अन्य बाबींवर खर्च झाल्यास वित्त आयोगाच्या या पैशाला शासन स्तरावरून गळती लागल्याने गावातील विकास कामांवर कोणता पैसा खर्च करावा ? हा प्रश्न आहे. वित्त आयोगाचा पैसा खर्च करतांना तो डी एससीने खर्च करावा असा आदेश आहे. पण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांनी तो चेक ने केला तरी चालते. तसेच सीएससी कंपनीला ग्रामपंचायतने चेकने पैसे दिले तरी चालतात. हा विरोधाभास कशासाठी? या कंपनीचे काम समाधानकारक नाही. कुठलीही स्टेशनरी ही कंपनी पुरवत नाही. तरी अधिका-यांमार्फत सरपंच यांच्यावर दबाव टाकुन हे पैसे सावकारी पद्धतीने वसुल करणे सुरु आहे.

खरे पाहता या कंपनीने ग्रामपंचायतीला काय सुविधा दिल्या? हे पाहणे सरकारला का गरजेचे वाटत नाही ? या पाठीमागचे गौडबंगाल काय आहे. शासनाने कर वसुलीसाठी जयोस्तुते मॅनेजमेंट कंपनीची निवड केली असुन १ जुलै पासुन तीचे काम सुरु होईल. ज्या कामासाठी वर्षाकाठी ५ ते ७ हजार रुपये लागत होते. त्याकामासाठी आता ६० हजार रुपये मोजा लागतील. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांचा खर्च यापेक्षा जास्त असेल याद्वारे याकर, सल्लागार एजन्सीला कोट्यावधी रुपये मिळणार आहेत.

यामध्ये सरकारला कोणाचे भले करायचे आहे? या एजन्सीचे काम रद्द करावे. सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र ही संघटना ग्रामीण भागाच्या विकासासाठी राजकारण विरहीत काम करत आहे. आमच्या मागण्या तात्काळ शासन दरबारी कळविण्यात याव्यात अन्यथा सरपंच परिषद मुंबई राज्यभर आंदोलन करील असा इशारा प्रदेशअध्यक्ष दत्ताभाउ काकडे यांनी दिला. या निवेदनावर प्रदेशउपाध्यक्ष अनिल गीते, महिला अध्यक्षा राणीताई पाटील, प्रदेश सरचिटणीस विकास जाधव यांच्यासह करमाळा तालुक्यातील सरपंच मनीषा भांगे, पुष्पा गोडगे, शितल नाळे, महेश कुलकर्णी, दादासाहेब गायकवाड, भरत खाटमोडे, काशिनाथ भुजबळ यांच्या सह्या आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE