करमाळासोलापूर जिल्हा

कुंभेज फाट्यावर शेकडो शेतकऱ्यांचे आंदोलन – खुपसेंचे धाडसी नेतृत्व ; पण तात्पुरता दिलासा

करमाळा समाचार 


तालुक्यातील शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडीत केल्यामुळे अहमदनगर टेंभुर्णी महामार्गावर कुंभेज येथे गणीमी काव्याने प्रवेश करीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व जनशक्ती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी केले होते. यावेळी आंदोलनाची व्याप्ती पाहून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तात्पुरत्या स्वरूपाची सवलत देण्याचे जाहीरही केले. पण सदरची सवलत काही दिवसांपुरती असल्याचे उपकार्यकारी अभियंता सुमीत जाधव यांनी सांगितले आहे.

तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतातील वीज ८ तासावरून दोन तास केली होती. तरीही शेतकऱ्यांच्या बाजुने ठोस पावले कोण उचलत नव्हते. त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव अतुल खुपसे यांनी आंदोलन करण्याचे ठरवले. याआंदोलनाला तात्पुरत्या स्वरुपात यशही आले आहे. बुधवार पासुन वीज आठ तास सुरु करण्यात येणार आहे. दरम्यान आंदोलनाच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त कडक ठेवण्यात आला होता. कोरोना पार्श्वभूमीवर आंदोलन दाबण्याचा डाव असु शकतो त्यामुळे खुपसे यांनी गणीमीकावा करीत कार ने न येता तीन चाकी रिक्षात प्रवेश केला व वेगवेगळ्या मार्गाने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना यायला सांगितले. त्यामुळे पोलिसांना चकवा देत आंदोलन यशस्वी केले. यावेळी खुपसे यांच्यासह किरण भांगे,अजित विघ्ने, राणा महाराज वाघमारे, अविनाश कोडलिगे महाराज, नाना तकीक, हनु यादव, शुभम बंडगर, विजय खुपसे यांनी आपले विचार व्यक्त केले.

विद्यमान आमदारांनी दोन तास वीज देण्याची घोषणा केली आहे. मात्र दोन तास वीज आल्यानंतर नदीतून किंवा विहिरीतून शेतात पाणी पोहचायला तेवढा वेळ लागतोय. ८ तास वीज मिळाल्यानंतर शेतकऱ्यांचा वीज प्रश्न मार्गी लागेल. आज शेतकऱ्यांच्या एकीचा विजय झाला असे मला वाटते. भविष्यात कोणत्याही शेतकऱ्यानी कसलीही समस्या आली तरी माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करेल.
अतुल खुपसे, अध्यक्ष जनशक्ती शेतकरी संघटना.

आंदोलनाच्या ठिकाणी लोकांची भावना लक्षात घेता काही दिवसांची मुदत देण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत काही दिवसांची मुदत ठरली आहे. या मोजक्या दिवसांच्या आत जर शेतकऱ्यांनी ठरल्याप्रमाणे रक्कम भरली नाही. तर पुन्हा एकदा वीज खंडीत करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. आज पासुन सुरु केलेली वीज ही कायम स्वरुपी नसुन तात्पुरती सवलत आहे.
सुमीत जाधव, उपकार्यकारी अभियंता, करमाळा.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE