भिलारवाडी प्रकरणातील बापावर गुन्हा दाखल ; खुन्याने आत्मह्त्या केल्याची अफवा
करमाळा समाचार
पत्नी व मुलीचा निर्दयपणे खून करून पळून जाणाऱ्या बापावर करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विविध कारणांमुळे सदरचा संशयित आरोपी हा कायमच पत्नीला त्रास देऊन माहेरी सोडवत होता. तर पुन्हा गोड बोलून नांदण्यासाठी आणत होता. सततच्या वादातून अखेर त्या दोघांनाही संपल्यावरच संशयीताचे समाधान झाल्याचे दिसून येत आहे.

सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास मायलेकी ला शिवन मशीनच्या साहित्याने मारून जखमी केले व मुलाकडे ठेवलेले वीस हजार रुपये घेऊन निर्दयीबाप हा पळून गेला. यावेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्या दोघींना दवाखान्यात जाण्यापूर्वीच मयत झाल्या होत्या.

आठ दिवसांपूर्वीच शिवीगाळ व मारहाण करून पत्नीला माहेरी देवळाली येथे सोडून गेला होता. पण पुन्हा सासरकडच्या मंडळीची समजूत घालून सदरच्या संशयित आरोपीने पत्नी व मुलांना पुन्हा माघारी घरी घेऊन आला होता. वाद थांबलेला दिसत असला तरी वाद मात्र थांबलेला नव्हता.
पहाटेच्या वेळी पत्नी व मुलीला मारण्यापूर्वी संशयित आरोपीने मुलाच्या रूमला बाहेरून कडी लावून व दोघींनाही संपवले. त्यानंतर आदल्या दिवशी रात्री मुलाकडे ठेवण्यासाठी दिलेले 20000 रुपये घेऊन तो निघून गेला. सर्व प्रकार पाहता अतिशय शांत डोक्याने हा खून केल्याचे दिसून येत आहे.
सदर प्रकरणात संशयित आरोपी अण्णासाहेब माने हा आपली पत्नी लक्ष्मी व मुलगी श्रुती हिचा खून करून स्वतः आत्महत्या केल्याची काल दिवसभर सोशल मीडियात चर्चा होती. परंतु तसे काही घडले नसल्याचा माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे. तरी सदर घटनेचा तपास सुरू असून त्याच्या तपासासाठी तीन पथके रवाना केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.