करमाळासोलापूर जिल्हा

उद्धवजी , लालपरी वाचवा

करमाळा समाचार – विशेष

‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय, हा मंत्र डोळ्यासमोर ठेवून गेली कित्येक दशके संपूर्ण महाराष्ट्राची सेवा करणाऱ्या एसटी महामंडळाचा डोलारा कोसळू लागला आहे .गेली जवळपास 18 महिने कोरोना च्या धक्क्यातुन सावरते न सावरते तोच एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. आणि रुळावर बसायला लागलेली तिची गाडी आता पुन्हा एकदा रूळ सोडून चालली आहे. गेल्या दोन महिन्यात 35 हून अधिक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर कर्मचारी सैरभैर झाले आहेत. आणि यातून आपल्याला शासनच वाचवेल अशी भाबडी आशा त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. त्यासाठी त्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन चालू केले आहे.

विविध राजकीय पक्षांचे विशेषता विरोधी पक्षांचे नेते मंडळी आंदोलनाच्या ठिकाणी येऊन जोरदार भाषणे ठोकू लागली आहेत. पण हेच विरोधक सत्तेत होते तेव्हा त्यांनी एसटी मंडळाचे सरकारीकरण करण्याचा का निर्णय घेतला नाही? उलट त्यांचे धोरण तर पूर्णपणे खाजगीकरणाच्या बाजूचे आहे. बोलणे सोपे असते खुर्चीवर बसल्यावर राज्यकारभार करताना, आर्थिक गणिते जुळवताना तारेवरची कसरत करावी लागते.

कायम विनाअनुदानित शिक्षक गेली 22 वर्षे विनावेतन काम करत आहेत. त्यांचे नेहमी आझाद मैदानावर आंदोलन असते. या आंदोलनाला विनोद तावडे विरोधी पक्षात असताना सर्वप्रथम हजर व्हायचे .आणि आम्हा शिक्षकांना मार्गदर्शन करायचे .पण पुढे भाजपचे सरकार आल्यानंतर हेच तावडे योगायोगाने शालेय शिक्षण मंत्री झाले. सर्व शिक्षकांचे आशा पल्लवित झाल्या, पण त्यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात त्यांना पाच टक्के शाळांना सुद्धाअनुदान देता आले नाही. विनाअनुदानित शाळेतील काही शिक्षक तर विनावेतन सेवानिवृत्त झाले आहेत.

ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देणारी ही लालपरी आहे .आज जेअधिकारी शासकीय सेवेत मोठ्या पदावर कार्यरत आहेत त्यांनी सुद्धा कदाचित या लाल परीने सवलतीचे पास काढून आपले शिक्षण पूर्ण केले असेल किंवा याच लाल परी तून आलेला डबा त्यांनी खाल्ला असेल .त्यामुळे कमीत कमी त्यांनी तरी या लाल परी साठी काहीतरी करावं अशी माफक अपेक्षा आहे.
आज एसटी महामंडळाचे अवस्था अतिशय नाजूक झाली असून महामंडळाच्या मक्तेदारीवर खाजगी वाहतुकीचे मोठ्या प्रमाणावर आक्रमण झाले आहे .ग्रामीण भागाच्या अर्थकारणाचे चालते-फिरते चक्र असलेल्या एसटी महामंडळाचा डोलारा कोसळतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे .आणि त्यातूनच त्या मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपल्या भविष्याची चिंता सतावू लागली आहे. आणि म्हणूनच त्यांनी संपाचे हत्यार उपसून सरकारवर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. परंतु राज्य सरकारची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता शासन एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या या मागणीस कितपत साथ देते हे यापुढील काळात पाहावे लागणार आहे. कर्मचाऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असून जवळपास चाळीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांची कुटुंबे उघड्यावर आले आहेत.

गोरगरिबांची ‘बहुजन हिताय ,बहुजन सुखाय, हे ब्रीद डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करणारी लालपरी वाचवण्याची खरोखरच शासनाची इच्छा असेल तर यावर शासनाने काहीतरी तोडगा काढला पाहिजे. कारण ती महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील गोरगरीब जनतेचे एसटीची अतूट नाते आहे. कमीत कमी ही पिढी जिवंत असे पर्यंत तरी हे नाते तुटता कामा नये .म्हणून एसटी जगली पाहिजे.
म्हणूनच, उद्धवजी, परब साहेब लालपरी वाचवा.

संजय साखरे.
९४२२४४६६२४

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE