तो पुन्हा आलाय ! काळजी घ्या
करमाळा समाचार-संजय साखरे
सावधान ! तो पुन्हा आलाय !
गेल्या वर्षी याच दिवसात नरभक्षक बिबट्याने करमाळा तालुक्यात धुमाकूळ घातला होता. त्याने तीन निरपराध लोकांचे बळी घेतले होते. यामुळे करमाळा तालुक्याच्या ग्रामीण भागात याची प्रचंड धास्ती बसली होती. आता पुन्हा अजून तालुक्याच्या पश्चिम भागात बिबट्याच्या पाऊलखुणा दिसू लागल्या आहेत .टाकळी, दिवेगव्हाण या परिसरामध्ये त्याच्या पावलांचे दर्शन झाल्यानंतर तो आता उजनी काठा ने पुढे पुढे सरकत आहे. रात्री सोगाव पश्चिम येथील शेतकरी लव सरडे यांच्या गावरान गायीचे वासरू बिबट्याने फस्त केले आहे.

दिवेगव्हाण आणि सोगाव येथील प्राण्यांच्या पावलांचे ठसे वनविभागाने पाहिल्यानंतर त्यांनी तो बिबट्याचा असल्याची माहिती दिली आहे .त्यामुळे उजनीकडेचा शेतकरी पुन्हा एकदा हादरला आहे .आता सध्या उसाची तोड मोठ्या प्रमाणावर चालू झाले असल्याने गावोगाव ,वस्त्यावर, माळरानात मजुरांच्या वस्त्या पडल्या आहेत .त्यांच्यामध्ये देखील यामुळे घबराट निर्माण झाली आहे .सर्वच बिबटे नरभक्षक असतात असे नाही, मात्र त्याची प्रचंड दहशत लोकांमध्ये निर्माण झाली आहे .शेतकऱ्यांना शेतातील कामे करताना दिवसा ,अप रात्री कधीही भीती वाटू लागली आहे. रात्रपाळीत लाईट आल्यावर पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जावे लागते यामुळे सध्या महावितरणने दिवसा शेती पंपाच्या वीज पुरवठा करावा अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.

वन्यजीव अभ्यासकांच्या मते
– बिबट्याने नेहमी रात्री वावरणारा प्राणी आहे .तो अत्यंत ला जळू प्राणी असून मिळेल त्या जागेत राहणारा व परिस्थितीशी जुळवून घेणारा प्राणी आहे. वृक्षतोडीमुळे बिबट्याने शेती हेच आपले राहण्याचे स्थान निवडले आहे. शेतीवर गुरांचे गोठे हे त्याला आकर्षित करतात .शेतीत सहज मिळणारे बेडूक, शेतकऱ्यांच्या शेळ्या-मेंढ्या व कुत्रे ही त्यांची मुख्य शिकार आहेत. वाढत्या इमारतीच्या जंगलामुळे व जंगल नष्ट झाल्यामुळे त्याच्याकडे आता दुसरा इतर पर्याय उरला नाही .म्हणून बिबट्या असलेल्या क्षेत्रात वावर करताना शेतकऱ्यांनी खालील गोष्टींचे पालन केले तर बिबट्याचा हल्ला पासून आपला बचाव होईल.
१) रात्री फिरताना घुंगराची काठी व बॅटरी सोबत ठेवा .मोबाईल वर मोठ्या आवाजात बोला .
२)बिबट्याने हल्ला केला तर तो सर्वात अगोदर गळा पकडतो म्हणून गळ्याभोवती मफलर गुंडाळा .
३)बिबट्या हा नेहमी त्याच्या पेक्षा कमी उंचीच्या प्राण्यावर हल्ला करतो म्हणून उघड्यावर शौचास बसू नका .शौचालयाचा वापर करा.
४) अंगणात झोपू नका, शक्यतो तारेचे कुंपण घाला ५)जनावरांच्या गोट्याला बंदिस्त तारेचे कुंपण घाला .
६)घराच्या जवळ शिळे अन्न फेकू नका कारण ते खाण्यासाठी कुत्रे जमा झाल्यावर त्यांच्यावर बिबट्या हल्ला करू शकतो.
७) घराच्या चारही बाजूंना मोठे लाईट लावा.
८) घराच्या आसपास ऊस व उंच वाढणारी पिके लावू नका.
९) बिबट्या ची पिल्ले दिसली तर त्यांच्याशी छेडछाड करू नका, कारण तो तिथे आसपास असेल तर हल्ला करू शकतो म्हणून ताबडतोब फोन विभागाला कळवा.
१०) लहान मुलांना एकट्याने सोडू नका. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे *वस्तुस्थितीची खात्री केल्याशिवाय अफवा पसरवू नका*. या गोष्टींचे पालन केले तर बिबट्या पासून आपला बचाव होऊ शकतो.
म्हणून शेतकऱ्यांनी सावधानता बाळगा.