करमाळासोलापूर जिल्हा

दूध दरवाढीने दिलासा, मात्र पशुखाद्य महागले

करमाळा समाचार – संजय साखरे


कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांची दूध दराबाबतची झालेली परवड आता थांबली असून दूध दर आता उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला दूध उत्पादनासाठी अत्यंत आवश्यक असणारा खुराक म्हणजे पेंडीचे दरही गगनाला भिडले आहेत .त्यामुळे कही खुशी, कही गम असे वातावरण दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे.

कोरोनाच्या काळात लॉकडावन मध्ये दूध उत्पादक शेतकरी दूध दरातील घसरणीमुळे मोठ्या प्रमाणावर हैराण झाले होते. याच दरम्यान दूध संकलन करणाऱ्या दूध उत्पादक संघांनी लॉक डाऊन च्या नावाखाली शेतकऱ्यांची अक्षरशः लूट केल्याचे पाहायला मिळाले. कोरोनाच्या काळात सरकारने दिलेले पाच रुपयाचे अनुदानही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नसल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळाले होते.

मात्र अलीकडच्या काळात दूध दराबाबत मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाली असून कोरोनाच्या काळात १८रुपये प्रति लिटर असणारा दूध दर आता ३५ रुपये प्रतिलिटर पर्यंत गेला आहे. करमाळा तालुक्यात अलीकडेच स्थापन झालेल्या भारतातील नामांकित अशा हॅट्सन दूध डेअरीचा रेट हा ३.५ फॅट ८.५ एस.एन एफ साठी ३७ रुपये प्रति लिटर इतका आहे.त्यामुळे हॅट्सन डेअरी कडे लोकांचा विश्वास वाढत चालत असल्याचे दिसून येत आहे.

मात्र दूध वाढ होण्यासाठी शेतकऱ्यांना जनावरांना सरकी ,गोळी, खपरी अशा प्रकारची पेंड द्यावी लागते. या पेंडीचे दर मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत .पेंड तयार करण्यासाठी मका हा कच्चा माल लागत असल्याने मक्याच्या दरात होणारी वाढ ही पेंडीची दरवाढ होण्याचे मुख्य कारण असल्याचे सांगण्यात येत आहे.

पंधरा दिवसांत ६० रुपये वाढ
मागील एक महिन्यापासून पशुखाद्याच्या दरात सुमारे 10% ची वाढ झाली असून सर्वाधिक वापरात असलेल्या गोळी पेंडीच्या दरामागे पंधरा दिवसात तब्बल साठ रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या गोळीपेंडीचे पोते १५०० ते १६०० रुपयाला असून ,खपरी २३०० ते २७००, गहू भुस्सा ९०० ते १०५०, मका भरडा १४००ते १५०० प्रति ५० किलो असा दर आहे. मात्र याच दरम्यान सरकी पेंडीच्या दरात किंचित घट झाली आहे.

माझे दूध हॅट्सन डेअरी असल्याने मला जर्शी गायी च्या दुधाला ३९ ते ४० रुपये प्रति लिटर इतका दर मिळत आहे. मात्र पशुखाद्याच्या दरात वारंवार वाढ होत आहे .
प्रविण दुरंदे,दूध उत्पादक शेतकरी
राजुरी.ता. करमाळा

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE