एक टिपरूही शिल्लक ठेवणार नाही- सुभाष आबा गुळवे
करमाळा समाचार – संजय साखरे
सध्या जास्त साखर उतारा देणाऱ्या ८६०३२, ८००५, १०००१ व २६५ आडसाली उसाची तोड चालू असून हा प्रोग्राम संपल्यानंतर २६५ व ४३४ खोडवा व पूर्वहंगामी या उसाची तोड करून तुमचा संपूर्ण ऊस गाळप करू तुमच्या उसाचे एक टिपरूही शिल्लक ठेवणार नाही असे प्रतिपादन बारामती ॲग्रो चे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी केले.

आज सकाळी राजुरी येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी राजुरी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभागृह येथे त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी ऊस उत्पादक शेतकरी व वाहन मालक यांनी आपल्या समस्या त्यांच्यापुढे मांडल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच ही भेट राजकीय स्वरूपाची नसून तुमच्या प्रपंचाची थेट निगडित असणाऱ्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण आलो आहोत असे त्यांनी स्पष्ट केले. ऊसाच्या प्रश्नात आपण कधीही राजकारण केले नाही आणि करणारही नाही असे त्यांनी ठामपणे सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात नंदकुमार जगताप यांनी राजुरीत एक ते सव्वा लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध असून त्यापैकी अद्याप 20 टक्के उसाची तोड झाली आहे ,त्यामुळे तुम्ही आम्हां शेतकऱ्यांसाठी आधारवड आहात .यामुळे हा प्रश्न सोडवा अशी विनंती केली.
यावेळी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तानाजी बापू झोळ, राजुरी चे सरपंच डॉक्टर अमोल दुरंदे, आर आर बापू साखरे, अप्पासाहेब सारंगकर, मा सरपंच संजय सारंगकर, सुनील पाटील, मनोज शिंदे, लालासाहेब भोईटे, नवनाथ साखरे, अंकुश दुरंदे यांच्यासह बारामती ॲग्रो साखर कारखान्याचे शेती अधिकारी बंडगर साहेब चाकणे साहेब, शेती विभागातील कर्मचारी व राजुरी आणि परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
