राजमाता जिजाऊ -हिंदवी स्वराज्याच्या प्रेरक शक्ती
करमाळा समाचार
छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणार्या मा साहेब जिजाऊ यांची आज जयंती, या निमित्तानं या महान राजमाते ला कोटी कोटी वंदन.
आपले क्रांतिकारक पती शहाजीराजे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविणाऱ्या जिजाऊ मा साहेब या एक हिंमतवान कर्तुत्वान व बुद्धिमान होत्या. मध्ययुगीन कालखंडात संपूर्ण हिंदुस्थान वर असणाऱ्या जुलमी राजवटीने मराठी जनतेवर अनन्वित अत्याचार केले होते. सतराव्या शतकाच्या मध्यात शहाजी राजांच्या मनात स्वराज्य स्थापन करण्याची कल्पना आली, आणि या कार्याला जिजाबाईंनी फार मोठी साथ दिली.

अत्यंत खडतर अशा परिस्थितीत बाल शिवाजी ला बरोबर घेऊन त्यांनी स्वराज्य निर्मितीचे स्वप्न त्यांच्या मनात फुलविले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी बहुजन समाजाच्या उद्धारासाठी महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. जगाच्या इतिहासात होऊन गेलेल्या अनेक कर्तुत्ववान महापुरूषांच्या जडणघडणीत त्यांच्या मातेचा ,पत्नीचा वाटा होता हे निर्विवाद सत्य आहे. मात्र या स्त्रियांचे कार्य फारसे प्रकाशझोतात येऊ शकले नाही. सतराव्या शतकात मराठा सरदारांच्या घरात जन्माला आलेली एक मुलगी पुढे स्वराज्याची प्रेरणा स्रोत बनली. अठरापगड जातीतील बहुजन मावळ्यांना बरोबर घेऊन त्यांनी शिवरायांसारखा आदर्श राजा घडवला हे त्यांचे कार्य लाख मोलाचे आहे. छत्रपती शहाजीराजे यांच्यापासून प्रेरणा घेऊन शिवरायांच्या मनात स्वराज्याची ज्योत पेटवण्याचे त्यांचे कार्य अत्यंत प्रेरणादायी असे आहे.

१५९८ते १६७४ असा त्यांचा पाऊणशे वर्षांचा प्रवास इतिहासाला अचंबित करणारा आहे .जन्म विदर्भात, सासर मराठवाड्यात, कर्तुत्व पश्चिम महाराष्ट्रात आणि मृत्यू कोकणात असा त्यांचा प्रवास सह्याद्रीच्या डोंगर रांगातील वळणासारखा नागमोडी असा आहे. त्यांनी शिवरायांना फक्त रामायण-महाभारत सांगितले नाही तर त्यांना बहुजनांचा वैभवशाली इतिहास सांगितला. खरे शत्रू कोण? खरे मित्र कोण? याची ओळख करून दिली. वामन, परशुराम हे बहुजनांचे शत्रू आहेत पण हिंदू धर्माने त्यांना देव केले. तेव्हा आपल्याला बहुजन समाजासाठी स्वराज्य निर्माण करायचे आहे अशी प्रेरणा त्यांनी दिली.
एका सरदाराच्या घरात जन्मलेल्या महिलेने स्वराज्या सारखे अशक्यप्राय स्वप्न उराशी बाळगून अपार कष्टाने ते सत्यात उतरवले. एका सामर्थ्यवान सरदाराची पत्नी म्हणून त्यांना ऐषारामी जीवन जगता आले असते, मात्र जिजाऊ मा साहेब त्या वाटेने न जाता स्वराज्य प्राप्तीच्या खडतर वाटेने गेल्या. शिवरायांना सोबत घेऊन स्वराज्याची उभारणी केली .आपला पुत्र राजा झाल्याचे पाहण्याचे भाग्य इतिहासात फक्त दोन मातांना लाभले ,एक म्हणजे गौतमीपुत्र सातकर्णी राजाची माता गौतमी आणि दुसर्या म्हणजे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब.
६ जून १६७४ ला रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला .आपला पुत्र राजा झाल्याचे पाहण्याचे भाग्य त्यांना लाभले. आणि मगच त्यांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली..
अशा धाडसी, कर्तुत्ववान, स्वराज्यसंकल्पि ता राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन..
-संजय साखरे (एम. ए. बी.एड )