करमाळ्यातील बॉक्सिंगपटू संग्राम माने यांना वकिलीची सनद प्रदान
करमाळा/प्रतिनिधी
करमाळा शहरातील राष्ट्रीय बॉक्सिंग खेळाडू संग्राम माने यांनी विधी अभ्यासक्रमाचे शिक्षण उल्लेखनीयरित्या पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना महाराष्ट्र व गोवा बार काऊन्सिलच्या वतीने दिली जाणारी वकिलीची सनद प्रदान करण्यात आली आहे.

करमाळा न्यायालय येथे महाराष्ट्र व गोवा बार काऊन्सिलचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य जेष्ठ विधिज्ञ ॲड. मिलिंद थोबडे यांच्या हस्ते ही सनद सुपुर्द केली गेली. संग्राम माने यांचे वडील सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण माने आणि आई स्वातीताई माने यांनी ही सनद स्विकारली. यावेळी ॲड. शहानूर सय्यद, ॲड. अजित विघ्ने आदि उपस्थित होते.

वकिलीची सनद मिळाल्यानंतर प्रतिक्रिया देताना ॲड. माने यांनी, वडील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असताना त्यांच्याकडे अडचणी घेवून येणाऱ्या उपेक्षित, वंचित समाजातील नागरिकांच्या व्यथा समजून आल्या, त्यांच्यावर अन्याय झाले तरी अज्ञानपणामुळे कायद्याची योग्य मदत त्यांना मिळत नसल्याचे जाणवले. त्यामुळे वकील होवून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करायचे ठरवले होते. त्यातूनच विधी शिक्षण पूर्ण केले, आता सामाजिक बांधिलकीतून सेवा देण्यावर भर देणार आहे. असे सांगितले.
तर सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण माने यांनी, संग्राम वकील झाल्याचा मोठा आनंद आहे. त्याच्या या पदवीचा उपयोग समाजातील तळागाळातील घटकांना न्याय मिळण्यासाठी व्हावा. जय भीम चित्रपटातील ॲड. चंदू या व्यक्तिरेखेप्रमाणे त्याने सेवा द्यावी. अशी इच्छा असल्याच्या भावना व्यक्त केल्या.
ॲड. संग्राम माने यांनी एस.एस.आर.ए. लॉ कॉलेज बीड येथे विधी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतले आहे. तर शहरातील नगरपरिषद शाळा क्रमांक तीन येथे पहिली ते चौथी, विखे-पाटील सैनिक स्कूल प्रवरानगर (अहमदनगर) येथे पाचवी ते दहावी, चव्हाण महाविद्यालय करमाळा येथे अकरावी ते पदवी असे शिक्षण पूर्ण केले आहे.
दरम्यान संग्राम माने हे बॉक्सिंगचे राष्ट्रीय खेळाडू असून ते नवोदित खेळाडूंना प्रशिक्षण ही देतात. वकिलीची सेवा देतानाच दर्जेदार बॉक्सिंगपटू निर्माण होण्यासाठी सातत्याने योगदान देणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
त्यांच्या या यशानंतर विविध क्षेत्रातील प्रतिनिधींनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.