करमाळासोलापूर जिल्हा

धरणग्रस्तांच्या संघर्षाला यश, शेलगाव ते ढोकरी रस्ता झाला खुला

करमाळा समाचार -संजय साखरे

करमाळा तालुक्यातील वांगी परिसरातील ढोकरी, बिटरगाव, भिवरवाडी , वांगी नं 1,वांगी नं 4 ,नरसोबावाडी या उजनी धरणामुळे पुनर्वसीत झालेल्या गावांसाठी महत्त्वाचा असलेला शेलगाव ते ढोकरी हा पोहोच रस्ता वांगी नं 3 येथील अडथळा दूर करून तब्बल अडीच वर्षाच्या धरणग्रस्तांच्या अतिव संघर्षातून काल खुला करण्यात आला. दररोज च्या दैनंदिन व्यवहारासाठी रस्ता खुला झाल्याने धरणग्रस्तां मधे आनंदाचे वातावरण असून लोक या कामी रस्ता संघर्ष समिती समिती ला धन्यवाद देत आहेत .

1976 साली उजनी धरणासाठी सर्वस्व त्यागलेल्या धरणग्रस्तांची गावठाणे जलाशय काठावर स्थापीत झाली . करमाळा तालुक्यातील तत्कालीन 22 गावांना जलसमाधी मिळाली. या 22 गावांची जलाशय काठावरील भौगोलिक रचनेमुळे 30 गावे झाली . या मधे मोठे क्षेत्र असलेल्या वांगी ,चिखलठाण, खातगाव,सोगाव ,केतूर आदी गावांची एका पेक्षा जास्त गावात विभागणी झाली . वांगी ची वांगी नं1,वांगी नं2,वांगी नं 3 ,वांगी नं4 अशी चार गावे झाली .

अशा पुनर्वसीत गावा ना नागरी सुविधा पुरवणे कायद्याने बंधनकारक असल्याने गावठाण अंतर्गत रस्ते,पोहोच रस्ते आदी 18 नागरी सुविधांचा त्यात समावेश आहे. पूर्वी चा अहमदनगर टेंभूर्णी हा राज्यमार्ग वांगी 1व 3 च्या मधे आणि धडसवाडी येथे ओढ्याने लवणाने उजनी चे पाणी पाठीमागे सरकल्याने पाण्याखाली गेला . त्यामुळे हा रस्ता शेलगाव पासून पांगरे, कवीटगाव मार्गाने कंदर ला गेला .

त्यामुळे या परिसरातील ढोकरी, भिवरवाडी, बिटरगाव, वांगी 1,वांगी 4, नरसोबावाडी या गावांना पोहोच रस्ता वांगी नं3 येथून जुन्या निंभोरै वाटेने वांगी नं 1 पर्यंत तयार करण्यात आला . तो 1976 सालापासून वहिवाटी खाली होता .यावर राज्य शासन तसेच जिल्हा परिषद यानी निधी खर्च करून खडीकरण, डांबरीकरण केले . इतकेच नव्हे तर 2014 -15 मधे शेलगाव ते ढोकरी दरम्यान 14 किमी अंतरात पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून भव्य व मजबूत रस्ता देखील करण्यात आला आहे. परंतु वांगी नं 3 गावठाणालगत 44 वर्षानंतर महेश आप्पासाहेब रोकडे व त्यांचे इतर बंधू यानी रस्ता मोडून त्यावर ऊस लागवड केली . त्यामुळे या भागातील दहा हजार नागरिकांच्या द्रष्टी ने महत्त्वाचा रस्ता बंद झाल्याने लोकांचे आर्थिक, मानसिक नुकसान झाले. ऊस,केळी, दूध या सारखी पिके बाजार नेणे ठप्प झाले . शाळकरी मुले मुली यांचे,व्रद्ध नागरिक,दुचाकी,चारचाकी वाहनधारक ,एस टी बस ,सगळ्यांचे येणे जाणे बंद झाले .

चर्चा, बैठका निष्फळ ठरल्या . भागातील सामाजिक, राजकीय कार्यकर्ते गट तट विसरून एकत्र आले . त्यातूनच धरणग्रस्तांनी केली “रस्ता संघर्ष समिती” ची स्थापना!

रस्ता संघर्ष समिती ने ढोकरी, बिटरगाव, वांगी ग्रामपंचायतीचे रस्ता करण्यात यावा अशा आशयाचे ठराव घेतले . ते शासन दरबारी दिले . मामलेदार अॅक्ट कलम पाच प्रमाणे तात्काळ कार्यवाही करण्या साठी करमाळा तहसीलदार यांच्याकडे सनदशीर मार्गाने दावा दाखल केला .

परंतु यात राजकारण आड आल्याने करमाळा तहसीलदार यांच्याकडील दाव्याची तक्रार माढा तहसीलदार यांच्याकडे वर्ग करण्यात आली. आणि दिरंगाई व्हायची ती झाली . प्रकरण तब्बल दोन वर्ष रखडले.

या दरम्यान तालुक्याचे माजी आमदार नारायण पाटील, जयवंतराव जगताप, आमदार संजय शिंदे यांची शिष्टाई देखील निष्फळ ठरली . अखेर जिल्हाधिकारी यांच्याकडे या बाबतीत निर्णय करण्यासाठी आमदार संजय शिंदे यानी प्रयत्न केले ,परंतु रोकडे बंधूची मागणी गैरवाजवी असल्याचे जिल्ह्याधिकारी बैठकीनंतर स्पष्ट झाले . त्यामुळे तहसीलदार माढा याना कलम 5 प्रमाणे रस्ता खुला करण्याचा आदेश करावा लागला .

रस्ता संघर्ष समिती चा तिथं पहिला विजय झाला .

याच बरोबर करमाळा न्यायालयात ही मेहेरबान कोर्टाने रोकडे यांची याचिका फेटाळून लावली. रस्ता संघर्ष समिती च्या विचाराने अॅड राकेश देशमुख यानी समर्थ पणे धरणग्रस्तांची बाजू लढवली .

शेवटी रस्ता खुला करण्याचा आदेश ही वेगवेगळ्या कारणाने सतत पुढे पुढे सरकला ,पण अखेरीस काल दि . 24 तारखेला मंडलाधिकारी वळेकर, तलाठी हेड्डे, यानी कलम 5 प्रमाणे कार्यवाही करून रस्ता खुला केला. या वेळी रस्ता संघर्ष समिती चे सदस्य बाजार समिती चे सभापती प्रा शिवाजीराव बंडगर, राष्ट्रवादी युवक चे माजी अध्यक्ष महेंद्र पाटील, आदिनाथ चे माजी संचालक भारत साळुंके, वांगी चे सरपंच विठ्ठल शेळके, अर्जुन आबा तकीक, शेतकरी संघटनेचे हनु यादव, दत्ता बापू देशमुख, सुधीर बापू देशमुख, तानाजी देशमुख, बिभीषण देशमुख, उपसरपंच ज्ञानेश्वर ढावरे, ग्रामपंचायत सदस्य राजकुमार देशमुख डाॅक्टर शेळके, हनुमान धनवे,महादेव नलवडे,तात्या मामा सरडे ,सचिन देशमुख, ढोकरी चे सरपंच किरण बोरकर, माजी सरपंच महादेव वाघमोडे, पांडुरंग खरात,आशिष बंडगर, बाळासाहेब महावर, सौदागर नलवडे देविदास तळेकर हरि तकीक प्रतिवादी रोकडे बंधू ,पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे उपअभियंता भिलारे,जि प सार्वजनिक बांधकाम चे उप अभियंता गायकवाड, व शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.

पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यानी चोख बंदोबस्त ठेवला होता

उजनी धरणग्रस्तांचे शेलगाव ते ढोकरी रस्ता अडवल्याने प्रचंड हाल झाले. रस्ता संघर्ष समितीने अथक प्रयत्न करून सनदशीर मार्गाने यश मिळवले. सदरचा रस्ता हा इजिमा असून या रस्त्याची रुंदी साधारणता 24 मीटरची परंतु प्रशासनाने फक्त 12 फूट रुंदीचा रस्ता खुला करून दिलेला आहे . यापुढे रस्त्या वरील अतिक्रमणे काढून अडथळा दूर करून 900 मिटर रस्ता रुंद करून दोन वाहने बसतील अशा पद्धतीचे रस्ता करण्याकरिता अंतरातील अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी निधी
मिळवण्यासाठी रस्ता संघर्ष समिती कंबर कसणार आहे .

प्रा शिवाजीराव बंडगर ,
सभापती ,क्रषी उत्पन्न बाजार समिती ,करमाळा

*चौकट*- उजनी धरणासाठी सर्वस्व त्यागलेल्या धरणग्रस्तांचे नागरी सुविधा मिळविताना 45 वर्षानंतर ही हाल सुरू आहेत . गैरवाजवी व अवास्तव मागणी करून लोकांचे जनजीवन कोणीही विस्कळीत करू नये .
रस्ता संघर्ष समिती यापुढे अपूर्ण कामासाठी निधी उपलब्ध करणार आहे .

-महेंद्र पाटील

माजी तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE