अखेर मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते पुजा ; 1987 पासुन वारी करणाऱ्या बीडच्या दांपत्याला मान
करमाळा समाचार टीम –
निवडणुक आयोगाच्या काही नियम व अटींच्या शर्तीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा विठ्ठल पुजेचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांनी आज सहकुटुंब विठ्ठल पुजा केली. यावेळी वडीलांसह नातवापर्यत सगळे हजर होते. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रथेप्रमाणे आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सौ. लताताई यांच्या शुभहस्ते सपत्नीक शासकीय महापूजा पार पडली.

मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांची ही पहिलीच महापूजा होती. अनेक वारकऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी पत्नी लता यांच्यासह विठुरायाची महापूजा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रुई गावच्या मुरली बबन नवले आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई मुरली नवले या शेतकरी दाम्पत्याला विठुरायाच्या शासकीय महापूजेचा मान मिळाला आहे.

गेली 20 वर्ष शेती करून आपल्या कुटुंबाला सांभाळणाऱ्या नवले कुटुंबात 1987 पासून वारीची परंपरा सुरु आहे. मुरली नवले हे दरवर्षी न चुकता सलग वारी करत आहेत. तसेच, ते श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातही गेल्या 12 वर्षांपासून पायी वारी करत आहेत.