मुसळधार पावसाने ऊसतोडीला ब्रेक , गाळप हंगाम लांबण्याची शक्यता
करमाळा समाचार – संजय साखरे
करमाळा तालुक्यात गेल्या चार दिवसापासून चालू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून याचा फार मोठा फटका शेती क्षेत्राला बसला आहे.

15 ऑक्टोबरला सुरू होणाऱ्या गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बारामती अग्रो साखर कारखान्याची ऊसतोड यंत्रणा करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागात दाखल झाली असून त्यांनी ऊसतोड करण्यास प्रारंभ केला आहे. परंतु पावसामुळे तोडणी योग्य असलेल्या उसातूनच पाणी वाहत असल्याने ऊसतोड थांबवावी लागली असल्याचे दिसून येत आहे.

याशिवाय तोडणी योग्य आलेल्या केळी पिकाचे नुकसान होत असून पावसामुळे खराब झालेल्या रस्त्याने गाड्या केळीच्या बागेपर्यंत नेता येत नसल्याने लांब वरची वाहतूक करून गाड्या भराव्या लागत आहेत.
यावर्षी उशिरापर्यंत पाऊस सुरू असल्याने त्याचा फार मोठा परिणाम ऊस गाळपावर होण्याची शक्यता आहे .ऊसतोड हंगाम लांबला तर ऊसतोड मजुरांकडून गेल्यावर्षीप्रमाणेच यावर्षीही शेतकऱ्यांची पिळवणूक होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे .यावर्षी साखर कारखाने एक ऑक्टोबरला जरी चालू झाले असते तरी चालले असते, कारण उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले असून एकट्या बारामती अग्रो साखर कारखान्याकडे गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 35 हजार एकर उसाची नोंद जास्त झाली आहे.
करमाळा तालुक्यातील आणि आसपासच्या परिसरातील सर्वच साखर कारखाने गाळपासाठी सज्ज झाले असून त्यांची यंत्रणा आता फक्त पाऊस थांबण्याची वाट पाहत आहे.
दरवर्षी चातकाप्रमाणे पावसाची वाट पहात येरे येरे पावसा असे म्हणणाऱ्या शेतकऱ्यांपुढे यंदा जा रे जा रे पावसा असे म्हणण्याची वेळ आली आहे. माझ्या आडसाली उसात बारामती अग्रो साखर कारखान्याने ऊसतोड चालू केली आहे परंतु पावसामुळे ऊसतोड थांबवावी लागत आहे .असे राजुरी येथील शेतकरी महेश विष्णु शिंदे यांनी सांगितले.