घराची वाटणी मागितल्यामुळे मुलासह सुनेला मारहाण ; सासु – सासऱ्यासह चौघांवर गुन्हा दाखल
करमाळा समाचार
राहत्या घराची वाट मागितल्या प्रकरणी मुलगा आणि सुनेला मारहाण करण्यात आली आहे. यामध्ये दोघेही जखमी झाले आहे. तर सुनेने दिलेल्या फिर्यादीवरून सासू-सासरा व दीर यांच्यावर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची मारहाण दि २ जुन रोजी कोंढेज येथे फिर्यादीच्या राहत्या घरी झाली आहे.

याप्रकरणी सासू इंदुबाई, सासरे हनुमंत, दिर नाना सर्व रा. कोंढेज व मावस दिर हरी कुर्डे रा. झरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे याप्रकरणी पूनम सागर बोराटे यांनी फिर्यादी आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुनम व सागर हे दाम्पत्य आपल्या सासू-सासऱ्यां सोबत कोंढेज येथे राहतात. त्यांच्यात घर जागेच्या वाटणीवरुन सारखे वाद होत होते. १ जून रोजी घर जागा वाटणीवरून किरकोळ वाद झालेला होता.
दि २ जुन रोजी रात्री नऊच्या सुमारास सदरचा वाद मिटवण्यासाठी सागर यांचा मावस भाऊ हरी कुर्डे हा घरी आला होता. यावेळी पूनम व सागर यांनी आपण राहत असलेली खोली ही कायमची आमच्या नावावर करावी असे म्हणताच सासूने शिवीगाळ सुरू केली, तर सासऱ्यांनी हाकलुन देण्याची भाषा करीत मुलगा सागर यास लाथा बुक्क्यांनी मारहाण करून काठीने हातापायावर पाठीवर मारहाण केली. तसेच दीर नाना यांनी भांडणे पूनम मुळे होतात असे म्हणून पूनमला मारहाण करण्यास सुरुवात केली.
यावेळी भांडण सोडवण्यासाठी आलेल्या हरी कुर्डे यांनीही पूनमच्या डोक्यात मारून तिला जखमी केले. यावेळी भांडणाचा आवाज ऐकून शेजारी आले. पण घरगुती वाद असल्याने कोणीही मध्ये पडले नाही. पुनम हिस डोक्यात जखम झाल्याने रक्त येत होते. त्यामुळे सासू-सासरे व दीर त्या ठिकाणाहून निघून गेले. तर पतीने पूनमला उपचाराकरता जेऊर येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले. यानंतर त्यांनी करमाळा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर सासू-सासरे दिरासह मावस दिरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.