तब्बल ४० वर्षानंतर पुनर्वसन विभागाकडुन केत्तुरमध्ये विकास कामांना सुरुवात
करमाळा समाचार -संजय साखरे
सोलापूर, पुणे व नगर या तीन जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरलेल्या उजनी जलाशयाकरीता 1975 साली केतुर गावचे भूमी संपादन होऊन केतुर १ व केतूर २ असे विभाजन झाले. त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या पुनर्वसन विभागाकडून केतुर १ मध्ये कोणत्याही प्रकारच्या प्राथमिक सेवा सुविधा मिळाल्या नव्हत्या. तब्बल 40 वर्ष रखडलेल्या केत्तुर गावठाणातील गावठाण रस्ते, स्मशानभूमी शेड , नवीन ग्रामपंचायत कार्यालय व बस स्थानक यासारख्या नागरी सुविधा पासून गाव वंचित होते.

आज अखेर या विविध विकास कामांना सुरुवात झाली असून चाळीस वर्षांच्या प्रतीक्षेला फळ मिळाल्याची भावना धरणग्रस्तांमधून व्यक्त होत आहे. केतुर १ ते केतुर २ या गावांना जोडणाऱ्या उजनी जलाशयावरील पुलासाठी अनेक वर्ष येथील लोकांनी संघर्ष केला. तालुक्यातील अनेक नेते मंडळींनी पोकळ आश्वासने दिली. अखेर या सर्व आश्वासनाला कंटाळून सन 2012 साली लोकवर्गणीतून या पुलाचे काम करण्यात आले.
2017 -18 ला तत्कालीन आमदार नारायण पाटील यांच्या पुढाकारातून ही कामे मंजूर करण्यात आली होती. परंतु गाव पातळीवरील काही अडचणी व कोरोना काळातील विकास कामांचे स्थगितीमुळे हे काम थांबले होते. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते विजय येडे यांच्या आमरण उपोषणाच्या नोटिशी नंतर पुनर्विकास विभागाला जाग आली व आमदार संजय मामा शिंदे यांनी याबाबत योग्य ती दखल घेऊन संबंधित ठेकेदार व उपअभियंता पुनर्वसन यांना सूचना केल्या. त्यानंतर आता केतुर- १ येतील विविध विकास कामांना सुरुवात झाली आहे.

गेल्या ४० वर्षापासून रखडलेल्या केतुर एक मधील विविध विकास कामांना आज सुरुवात झाली असून यामुळे अनेक वर्ष मूलभूत सुविधा पासून वंचित असलेल्या आमच्या गावाला आता या सेवा सुविधांचा लाभ मिळणार आहे.
– लक्ष्मीकांत पाटील,नागरिक केत्तुर -१.