प्रशासन कुचकामी करमाळ्यात पाण्यासह घाणीचा प्रश्न ; माणसापेक्षा जनावरे बरी म्हणण्याची वेळ
करमाळा समाचार

सध्या करमाळा नगर परिषदेवर नगरसेवकांची पदे रिक्त झाल्यामुळे प्रशासकाचे काम सुरू आहे. त्यातच मुख्याधिकारी नसल्याने सदरचा प्रभार हा दुसऱ्या मुख्याधिकाऱ्यांवर सोपवण्यात आला आहे. शहरातील पिण्यच्या पाण्याचा बोजवारा तर उडालाच आहे. पण स्वच्छतेचा विचार न केलेला बरा इतकी दुर्गंधी सध्या ठीक ठिकाणी झालेली असताना प्रशासकी मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे.

प्रशासन काम करत नाही म्हटल्यानंतर लोकांनी घाणीवर ताबा ठेवणे गरजेचे असताना जनावरांपेक्षा वाईट अवस्था माणसांनी करून ठेवली आहे. जिथे घाण नाही तिथेही मोठ्या प्रमाणावर घाण साठवली जाते. रहिवासी परिसरात घाण आणून टाकली जाते. ज्या ठिकाणी आपले घर नाही त्या घराच्या अंतरावर दुसऱ्याचे घर आहे, लहान लेकरे खेळतात, इतर लोक त्या परिसरातून वावर करतात याचेही भान सदरच्या लोकांना असल्याचे दिसून येत नाही. अशा लोकांमुळे दुष्काळात तेरावा महिना म्हटल्यासारखं घाण काढायला माणसं नसताना घाण करायला पुढाकार घेत आहेत. अशा लोकांना देव कधी बुद्धी देईल हा मोठा प्रश्न आहे.
सदरचा फोटो हा खंदकरोड परिसरातील आहे. निम्म्या रस्त्यावर स्वच्छता असून उर्वरित रस्त्यावर मात्र अतिशय दुर्गंधी पसरली आहे. त्या ठिकाणी बाहेरून आलेले परप्रांतीय लोक भाडेकरू म्हणून राहतात. त्यांनी सदरचा परिसर इतका घाण करून टाकला आहे की तिथे ये जा करणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे एक वेळ माणसांपेक्षा जनावर भली असे म्हणण्याची वेळ या ठिकाणी आली आहे. कशीबशी नगरपरिषद आठवड्यातून का होईना सदरचा परिसर सारखे स्वच्छ करते. पण परत आठवडाभर घाण टाकायचं काम परिसरातील लोक करत आहेत. त्यामुळे गल्लीच मोठी कचराकुंडी होऊन बसली आहे.
