करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

करमाळ्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील अंतर्गतवाद चव्हाट्यावर ; पाटलांचा पर्याय शोधणे शिवसेनेला धोक्याचे

करमाळा समाचार

एकीकडे राज्यभर शिंदे यांच्या शिवसेनेत इनकमिंग सुरू असताना करमाळ्यात मात्र आता अंतर्गत गटबाजीमुळे शिंदे गटात श्रेयवादासाठी लढाई सुरू झाली आहे. नुकतेच करमाळा बस स्थानकासाठी दोन कोटी रुपयांचा कॉंक्रिटीकरण करण्याकामी निधी मंजूर झाला आहे. सदरचा निधी माजी आमदार नारायण पाटील यांच्या पाठपुरावाने मंजूर झाल्याचे पाटील गटाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. तर त्याला आता शिंदे गटातील महेश चिवटे यांच्या निकटवर्तीय शिवसेनेच्या उपप्रमुख नागेश गुरव यांनी असहमती दर्शवली आहे.

मागील विधानसभेला माजी आमदार नारायण पाटील यांना शिवसेनेने तिकीट नाकारल्यानंतर पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवत आपली वैयक्तिक ताकद दाखवून दिली होती. तर यावेळी शिवसेनेला सोडत कट्टर शिवसैनिकांनीही माजी आमदार नारायण पाटील यांची साथ दिली होती. यामध्ये सध्याचे शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष महेश चिवटे यांचाही समावेश होता.

महेश चिवटे यांचे बंधू मंगेश चिवटे हे मुख्यमंत्री यांचे ओएसडी म्हणून कार्यरत आहेत. तर चिवटे बंधूंचे मुख्यमंत्र्यांजवळ मोठे वजन असल्याचे मानले जाते. तर शिवसेना दोन गट पडल्यानंतर माजी आमदार नारायण पाटील यांनीही उघडपणे शिंदे गटाला पाठिंबा देत आपली भूमिका जाहीर केली होती. तेव्हापासून ते शिंदे गटाचे काम करत असल्याचे दिसत होते. पण आता चिवटे हे माजी आमदार पाटील यांच्यापासून थोडेसे अलिप्त झाल्याचे दिसत आहेत.

तालुक्यात माजी आमदार नारायण पाटील यांचा मोठा गट आहे. त्यांच्या भूमिकेमुळे शिंदे गटाला वजनदार नेता मिळाला आहे. दरम्यानच्या काळात झालेल्या निवडणुकांवर पाटील गटाच्या रूपात शिंदे सेनेला आकडेवारी दाखवता आली होती. तर सध्या शिंदे गटाकडून येणाऱ्या काळात उमेदवार कोण असेल याचीही चाचणी सुरू आहे अशा काही ठिकाणी बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. एवढा मोठा नेता व चांगले काम असतानाही जर शिंदे गटाला पाटील यांच्याशिवाय कोण ? याची चाचणी करावी लागत असेल तर त्यांना पाटील नको आहेत का असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

पाटील यांना शिंदे गटाने जर दूर केले यात पाटील गटाचा कमी पण शिंदे शिवसेनेचा मोठ्या प्रमाणावर तोटा होऊ शकतो. याची जाणीव वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनाही असणार आहे. अशातच स्थानिक पातळीवर चालू असलेली कुरघोडीचे राजकारण न थांबल्यास याचा तोटा शिंदे गटाला सहन करावा लागू शकतो. पर्यायाने येथील विरोधी गट बलशाली होऊ शकतो.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE