एटीएम चोरी प्रकरणात तीन ताब्यात पण भिती कायम ; सतर्क रहा
करमाळा समाचार
गजबजलेल्या भागातून रविवारी पहाटे पाचच्या सुमारास आयडीबीआय बँकेच्या एटीएम रूम मध्ये घुसून अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या साह्याने एटीएम फोडून त्यातील १३ लाख ६४ हजार रुपये रक्कम घेऊन पसार झाले होते. याबाबत सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली होती. त्यानुसार विटा पोलिसांनी गस्त घालत असताना एक आयशर टेम्पो आणि त्यामध्ये तिघांना एटीएम फोडण्यासाठी वापरण्यात येणारे वस्तू घेऊन जात असताना ताब्यात घेतले व करमाळा पोलिसांच्या ताब्यात दिले.
या प्रकरणात तीन संशयीत आरोपींना पकडले असून त्यामध्ये सैफुल खान, निसियुम अहमद व हसन रहमत सर्व रा. हरियाणा असे संशयीतांची नावे आहेत. यांना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदर प्रकरणातील टोळी बाहेर राज्यातील हरियाणा भागातील आहे. काही दिवसांपूर्वी अशा पद्धतीची टोळी महाराष्ट्रात सक्रिय असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्याची चर्चा होती. त्या आधारावर गाड्यांच्या तपासण्या व गस्त घालण्यात येत होत्या. साधारण रात्री दोन ते चार वाजेपर्यंत अशा पद्धतीच्या चोऱ्या होत असतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी कडक पहारा असतो हे चोरांनाही लक्षात आले असावे. त्यामुळेच त्यांनी पहाटे जेव्हा लोक फिरायला जातात त्यावेळेसची वेळ चोरीसाठी निवडली होती. अवघ्या दहा मिनिटात एटीएम वर हात साफ करून पोबारा केला होता.
विटा जिल्हा सांगली येथे पकडण्यात आलेल्या तिघांकडे केवळ गॅस कटर व इतर साहित्य मिळून आले आहे. परंतु अद्यापही चोरीला गेलेली रक्कम कोठे व कोणाकडे आहे ही माहिती मिळणे बाकी आहे. त्यासाठी पोलिसांनी पुढील तपासासाठी न्यायालयाकडे दहा दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. यावेळी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी म्हणून भार्गवी भोसले यांनी काम पाहिले. सदर घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. एन. जगदाळे हे करीत आहे.
प्रमुख आरोपी अजुनही मोकाट … सर्तक रहा
संबंधित संशयीतांना पकडल्यानंतर पोलिसांशी संपर्क साधला असता. या प्रकरणातील प्रमुख आरोपीच अद्याप हाताशी लागलेले नाहीत असे दिसून येत आहे. त्यामुळे तपासाची दिशा ठरवून ताब्यात असलेल्या लोकांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सदरची टोळी मोजक्या लोकांची नसून यामध्ये बरेचसे चोर असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या टोळीचा म्होरक्या व यात आणखी किती लोक आहेत आत्ताच सांगणे कठीण आहे. त्यामुळे या टोळी आणखी चोरी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जागरुक रहा बॅंकाने सुरक्षा व्यवस्था वाढवत सतर्क राहिले पाहिजे.