शेकडो वर्षापुर्वीचे मंदीर पण स्वच्छतागृहाचा पत्ता नाही ; सुरु असलेले काम निकृष्ट दर्जाचे ?
करमाळा समाचार
करमाळा तालुक्याचे आराध्य दैवत श्री कमला भवानी माता मंदिरात हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. या ठिकाणी शासनाच्या मार्फत बराचसा निधीही उपलब्ध होतो. याच्या माध्यमातून भक्तनिवास व इतर सुविधा ही उपलब्ध केले आहे. सध्या वेगात कामही सुरू आहेत. त्या ठिकाणी सिमेंट रस्ते व इतर कामांसाठी निधी आलेला आहे. पण ते काम योग्य होतेय का ? शिवाय एवढ्या मोठ्या मंदिरात महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृह आजतागायत बांधण्यात आले नाहीत. त्याचा निधी कुठे गेला असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

सध्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली असता मागील बाजूस 96 पायऱ्याच्या विहिरीकडे जात असताना समाधी परिसर आहे. त्या ठिकाणी पेवर ब्लॉक टाकण्यात आले आहेत पण यापूर्वी त्या ठिकाणी फरशीचे काम करण्यात आले होते. ते फरशीचे काम जसे चे तसे ठेवून त्यावरच पेवर ब्लॉक टाकण्याचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे सदरचे काम टिकेल का नाही हा मुळात मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. निधी आला, कामाला ठेकेदार नेमला नंतर कामही पूर्ण होत आले पण जर अशा पद्धतीने काम होत राहिले तर लवकरच ते खराब झाल्याशिवाय हे राहणार नाही. त्यामुळे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

तसेच मंदिर असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाला होता. या निधीतून भक्तनिवास व इतर सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण हजारोच्या संख्येने येणाऱ्या भक्तांना आजही त्या ठिकाणी स्वच्छतागृह उपलब्ध नसतील तर यापेक्षा दुर्दैव काय असेल. स्वच्छतागृहाच्या नावाखाली केवळ दोन शौचालय उभे केले आहेत. त्याला फक्त आडोशाला एक भिंत आहे. पण आत मध्ये दरवाजेच नाहीत अशी परिस्थिती असलेला हे शौचालय पुरेशी आहे का ?
तर लोकांनी मागणी केल्यानंतर भक्तनिवासाच्या दिशेने इशारे दाखवत त्या ठिकाणी स्वच्छतागृह असून त्या ठिकाणी जाण्याच्या सूचना केल्या आहेत. पण एवढ्या मोठ्या संख्येने जेव्हा फक्त मंदिरात दर्शनात येतात किंवा स्थानिक भक्त रोज जे दर्शनाला जात आहे यांनी स्वच्छतागृहाचा वापर कसा करायचा.
केवळ निधी आणि कामे मंजूर करून उपयोग नाही तर याचे नियोजन व्यवस्थित झाले पाहिजे. आलेल्या निधीचा वापर योग्य पद्धतीने झाल्यास त्या ठिकाणी स्वच्छतागृह, रस्ते, लाईट, पिण्याचे पाणी इतर सर्व सुविधा उपलब्ध झाल्याने भक्तांची गैरसोय होणार नाही.