नवरा कोरोनात गेला आणि अवकाळीने मुलाला नेले ; पवार कुटुंबावर दुखा:चा डोंगर
करमाळा समाचार
तालुक्यात वेगवेगळ्या भागात सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने पुन्हा एकदा नुकसान झाले आहे. वरकुटे येथे म्हैस, टाकळी येथे शेळी तर रावगाव येथे एका युगाचा मृत्यू झाला आहे. कोरोना काळात वडील गमावल्यानंतर नुकताच बारावी मध्ये ६१ टक्के गुण मिळवलेला जयदीप बापू पवार याचा मृत्यू झाला आहे. जबाबदारी स्वीकारणाराच गेल्यामुळे पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दुपारी चारच्या सुमारास रावगाव व परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली होती. रिमझिम पाऊस काही काळातच थांबला. त्यानंतर जयदीप याने घराबाहेर असलेल्या झाडाजवळ काहीतरी कामाच्या निमित्ताने आला व काम करीत असताना अचानक वीज अंगावर पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. जयदीप हा नुकताच बारावीच्या परीक्षेत ६१ टक्के गुण मिळवून पास झाला होता. कर्जत येथील महाविद्यालयात त्याचे शिक्षण सुरू होते. घराची जबाबदारी त्याच्यावर असल्याने चांगले शिक्षण घेऊन घर चालवणे त्याचे छोटेशे स्वप्न होते.

कोरोना महामारीत गवंडी काम करणारे जयदीपच्या वडीलांचे आजारपणाने निधन झाले होते. कुटुंबाची सगळी जबाबदारी जयदीपच्या आईवर आलेली. दोन मुली व एक मुलगा यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी व अचानक पती गेल्यामुळे आई शांताबाई यांना मानसिक त्रास झाला. तरीही त्यांनी मुलाला शिकवण्याची ठरवले होते. करमाळा येथे महाविद्यालय असतानाही शिक्षणासाठी जयदिपला कर्जत येथील महाविद्यालयात पुढील शिक्षण सुरू केले.
त्या ठिकाणी त्याने ६१ टक्के गुण मिळवून पासही झाला. पुढील प्रवेशाबाबत नियोजन सुरू असतानाच शिवाय १७ वर्षीय जयदीप आता घर चालवण्या योग्य झालेला असताना अचानक गेल्याने पवार कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्च्यात आई व दोन बहिणी असा परिवार आहे.