तहसिल कार्यालयाला जागा मिळेना गावाबाहेर हलवण्याच्या हालचाली ; त्रासदायक ठरण्याची शक्यता
करमाळा समाचार – विशाल घोलप
करमाळा प्रशासकीय कार्यालय सर्व एकाच ठिकाणी आणण्याच्या उद्देशाने विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांच्या माध्यमातून निधीची तरतूद करण्यात आली आहे. परंतु शहरात जागा उपलब्ध होत नसल्याने शहरापासून एक किमीच्या अंतरावर मौलाली माळ येथे सदरची इमारत हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी त्या ठिकाणचा सर्वे करण्यात आला आहे. पण शहरात पासून जवळ असलेली जुनी इमारत आजही सुस्थितीत आहे. त्याची जागा बदलताना लांब जावे लागत असल्याने लोकांना त्रासदायक ठरू शकते.
करमाळा शहर हद्दीमध्ये तहसील परिसरात इतरही प्रशासकीय कार्यालय आहेत. पण ते वेगवेगळ्या अंतरावर असल्याची दिसून येतात. १०० वर्ष जुनी इमारत असताना आजही भक्कम व सुस्थितीत असल्याने ते बांधकाम पाडले जाणार नाही. तहसिल परिसरात कोर्ट, पोलिस ठाणे व इतर सर्व कार्यालय एकाच ठिकाणी असल्याने लोकांना त्या ठिकाणी येण्यास सोपे जाते. जुनी इमारत व परिसर बस स्थानकापासून चालत येण्याच्या अंतरावर असल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर आहे. तर त्या ठिकाणी जागा उपलब्ध होत नसल्याने सदरची इमारत ही मौलाली माळ येथील इदगाह मैदानापासून १०० मीटर अंतरावर शासनाच्या जागेत घेण्याची तयारी सुरू आहे.
या ठिकाणी तहसील, कृषी, मोजणी, होमगार्ड व बांधकाम विभाग अशी कार्यालय हलवण्याचे नियोजन सुरू आहे. तर मूळ ठिकाणी पंचायत समिती व पोलीस स्टेशन कायम तिथेच राहील असे दिसून येते. यामुळे तहसील व पंचायत समिती हे दोन कार्यालय वेगवेगळे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकाच वेळी दोन्ही ठिकाणची कामांसाठी एक ते दीड किलोमीटरचा पल्ला लोकांना पार करावा लागेल असे दिसून येत आहे. येणाऱ्या काळात सदरची नवी प्रशासकीय इमारत भव्य व टोलेजंग जरी होत असली सर्व सुविधायुक्त दिसत असली तरी सामान्य लोकांच्या आवाक्यापासून लांब असणार आहे. त्यामुळे शहरातच इमारत असावी अशी सामान्य लोकांचे मत आहे.
सध्या करमाळा तहसील परिसरामध्ये कृषी कार्यालय वगळता सर्वच कार्यालय एकाच ठिकाणी असल्याचे दिसून येते. त्यामध्ये तहसील कार्यालय, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम, पोलीस ठाणे, महिला व बालकल्याण, शिक्षण, तालुका आरोग्य व ग्रामीण पाणीपुरवठा अशी कार्यालय एकाच परिसरात आहेत. त्यामुळे एका वेळी सर्व कार्यालयांचा फेरफटका मारणे सोपे होते. तर आता जागा उपलब्ध नसल्याने नव्या प्रशासकीय इमारतीसाठी तहसील, कृषी, मोजणी व बांधकाम यासारखी महत्त्वाची कार्यालय हे मौलाली माळ परिसरात नेली जाणार आहेत.
सदरचे कार्यालय लगेच उद्या उठुन गावाबाहेर जाणार नसले तरी कधी ना कधी हे कार्यालय बाहेर जाणार हे नक्की झाले आहे. त्यामुळे आज ना उद्या या मुळे त्रास होऊ शकतो. आज ज्या ठिकाणी इमारत उभा आहे त्या भागात तहसिल व इतर कार्यालयामुळे शोभा आहे. तिथुन हे कार्यालय बाहेर गेल्यास आपसुकच परिसरात अपेक्षीत लक्ष राहणार नाही. परिसरात मोडकळीस आलेल्या इमारती असुन त्या जशा खंडर झाल्या तसेच जुनी इमारत पण दुर्लक्षित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आहे त्या परिसरात इमारत झाल्यास परिसर व सामान्य लोकांचा फायदा आहे.