उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याहस्ते शिरसोडी – कुगाव पुलाचे भुमिपुजन
करमाळा समाचार
शिरसोडी तालुका इंदापूर व कुगाव तालुका करमाळा यांना जोडणाऱ्या उजनी धरण बॅक वॉटर मध्ये लांब पुलाचे बांधकाम करणे या कामाचा भूमिपूजन समारंभ शिरसोडी येथे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते होणार आहे.
सदरचा कार्यक्रम 23 ऑगस्ट रोजी आयोजित केला असून कार्यक्रमाचे अध्यक्ष सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रविंद्र चव्हाण हे असणार आहेत. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व आमदार दत्तात्रय भरणे यांच्यासह अध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदीप दादा गारडकर आदींच्या उपस्थितीत सदरच्या कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
शिरसोडी कुगाव या पुलाची मागणी बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित होती. या पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर करमाळा तालुक्यातील उजनी पट्ट्यातील गावांचा वळसा घालून जाण्याचा त्रास कमी होणार आहे. तर इंदापूरची ही उलाढाल यामुळे वाढताना दिसेल. शिवाय करमाळा तालुक्यातील बॅकवॉटर भागातील लोकांना आरोग्य, शिक्षण व इतर सुविधांसाठी तात्काळ मदत उपलब्ध होऊ शकते.