करमाळासोलापूर जिल्हा

बागल विरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलनादिवशी घडला मजेशीर किस्सा ; विडिओत लक्षात आले नसेल तर बातमी वाचा

करमाळा समाचार 

मागील काही दिवसांपूर्वी मकाई सहकारी साखर कारखान्यावर झालेल्या वादावादीनंतर करमाळा तालुक्यात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. पण अशातूनही एकदम अशीच गमतीशीर घटना घडली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांसह नेत्यांनाही हसू आवरणार नाही. मुळातच राजकीय आंदोलनाने व वाद हे क्षणिक असतात त्याचा बाऊ करून आयुष्यात कायमचं वैरत्व घ्यायचे नसते हे या घटनेतुन समजुन घेतले पाहिजे.

बागल गट व स्वाभिमानी शेतकरी संघटना हे आमने-सामने आले. दोघांनीही एकाच दिवशी एकमेकांच्या विरोधात मोर्चे ही काढले. या मोर्चामध्ये दमबाजी झाली, धमक्या देण्यात आल्या. पण सुरुवातीपासुन बागल गटाकडून शेतकरी संघटनेला विरोध केला जात नव्हता. पण काही कार्यकर्ते शेतकरी संघटनेने आडुन कारखाना बंद पाडण्याचा घाट घालत आहेत असा आरोप मात्र बागल गटाकडून केला जात होता. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना व पक्ष प्रमुख राजू शेट्टी यांच्याबाबत बागलांची भूमिका सौम्यच होती.

परंतु तुपकर यांनी घेतलेल्या भूमिकेचा समाचार मात्र सर्व कार्यकर्त्यांनी घेतला. आंदोलन करणारे ही शेतकरीच होते. त्यामुळे शेतकरी संघटनेच्या इतर आंदोलनामध्ये हेही अनेकदा सहभागी झालेले. पण परवाचे मकाईवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन बऱ्याच जणांना पचनी पडलेले नाही. त्यामुळे थेट ते बागल यांच्या समर्थनात समोर येऊन तहसील कचेरी पर्यंत पोहोचले.

यावेळी विविध घोषणाही देण्यात आल्या. रविकांत तुपकर यांना विरोध करण्यात आला. डोळे काढण्याच्या भाषेवर बोलण्यात आले. त्यांच्यावर कारवाईची मागणी ही आली. या धामधुमीत एकाने “शेतकरी संघटनेचा …” अशी घोषणा दिली. तर त्यावर लगेचच प्रत्युत्तर म्हणून उपस्थित लोकांकडून विजय असो अशी घोषणा आपसूकच तोंडातुन आली. वास्तविक पाहता तो मोर्चा शेतकरी संघटनेचे नेते व कार्यकर्त्यांच्या विरोधात असताना सदरची घोषणा अनेकांच्या लक्षातही आली नाही.

आज ती क्लिप सर्वत्र व्हायरल होत आहे. यातून जो तणाव निर्माण झाला होता. तो एक प्रकारे कमी होईल अशी अपेक्षा आहे. यातुन कोणालाही विरोध करायचा नाही किंवा चुका काढायच्या नाहीत. त्यामुळे यावर बागल गटातील कार्यकर्ते व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ही कार्यकर्ते एक मजेशीर बाब म्हणून बघत आहे आणी त्या दोघांनीही त्याकडे त्याच पद्धतीने बघावे असे वाटते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE