मोठ्या घडामोडीनंतर मतदारांची पसंती कोणाला ? ; ३६ गावे महत्वाची पण मदार ११८ गावांवर
करमाळा समाचार
करमाळा विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्वाधिक घडामोडी पहायला मिळाल्या जे प्रमुख कार्यकर्ते व नेते शिंदे यांच्यासोबत होते त्यांनी साथ सोडली तर नव्याने काही सदस्य त्यांच्यासोबत जोडले. यामुळे तालुक्यात घडलेल्या घडामोडींमुळे पुन्हा एकदा शिंदेंना पसंती मिळेल की सत्तापालट होईल याकडे तालुकावासियांचे लक्ष लागून राहिले आहे. विशेष म्हणजे निवडणुकीत करमाळा तालुक्याला छत्तीस गावे जोडलेली असतानाही निकाल हा करमाळ्यातील प्रतिसादावरच लागण्याची शक्यता आहे.
तालुक्याच्या राजकारणात सुरुवातीपासूनच धक्क्यावर धक्के बसू लागले व विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांच्या सोबत असलेले मोठे गट हे साथ सोडून जाऊ लागले. त्यामध्ये माजी आमदार जयवंतराव जगताप सावंत, सावंत गट, कंदर येथील भास्कर भांगे यांचा त्यामध्ये समावेश आहे. गावोगावी जात असताना संजयमामा शिंदे यांनी नवीन फळी उभा करीत भाजपाचे गणेश चिवटे व मनसेचे संजय घोलप यासह इतर कार्यकर्ते जोडण्यास सुरुवात केली. यावेळी शहरातील मदार ही कन्हैयालाल देवी यांच्यावर असल्याचे दिसून आले.
मागील वेळी राष्ट्रवादी पक्षाच्या पाठिंब्यावर व तसेच विविध पक्ष व संघटना यांच्या माध्यमातून अपक्ष निवडणूक लढवलेले संजयमामा शिंदे हे निवडणूक विजयी झाले होते. पण यंदाचे वेळी राष्ट्रवादीतून उभा न रहाता त्यांनी अपक्ष उभारण्याचा निर्णय घेतला. दरम्यान महाविकास आघाडीतून राष्ट्रवादीला करमाळ्याची जागा सुटली व माजी आमदार नारायण पाटील यांना तुतारी हे चिन्ह मिळाले. यामुळे राष्ट्रवादीचा मतदार हा आपसूकच पाटील यांच्या बाजूने गेलेला दिसून आला. त्यांच्यासोबत सुभाष गुळवे यांच्यासारखे मात्तबरही सोबत आले. हा सर्वात मोठा धक्का होता. तरीही शिंदे यांनी प्रयत्न चालू ठेवले होते. त्यांनी त्यांच्यासोबत असलेल्या अजित दादा पवार यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन वाटचाल चालू ठेवली. पण बरेचसे कार्यकर्ते हे मूळचे शिंदे गटाचे असल्याने त्याचा कितपत प्रभाव पडेल हे सांगणे कठीण आहे.
2019 च्या निवडणुकीमध्ये पाहिजे तितका सक्रिय नसलेला मोहिते-पाटील गट यंदा मोठ्या प्रमाणावर सक्रिय दिसला. करमाळा तालुक्यासह छत्तीस गावात त्यांनी लक्षवेधी असे काम केले आहे. त्यातून पाटील यांना मताधिक्य वाढवण्यासाठी त्यांचे सहकार्य लाभल्याचे दिसून आले. यंदाच्या वेळी संपूर्ण बागल व पाटील गटाचे कार्यकर्ते हे छत्तीस गावात आवर्जून थांबलेले दिसून आले. त्या परिसरात यंदा मतदान घटल्याचही दिसून आलं आहे. कुर्डूवाडी सारख्या शहरात 16000 मतदान झाले होते. तर यंदाच्या वेळी ते जेमतेम बारा ते तेरा हजारापर्यंत जाऊन पोहोचले आहे.
तर 36 गावातील मताधिक्य हे संजयमामा शिंदे यांना मिळणारच आहे. हे सर्वांनी गृहीत धरूनच त्या भागात काम केले व करमाळा तालुक्यातही काम चालू ठेवले अशा परिस्थितीत छत्तीस गावातील मताधिक्य व करमाळा तालुक्यातील मतदान यावर सध्या संजय मामा शिंदे यांची मदार आहे. करमाळा तालुक्यात कोणत्या उमेदवाराला मताधिक्य व पसंती मिळते यावरच खरा निकाल अवलंबून राहणार आहे. शिंदे यांनी करमाळा तालुक्यात बरोबरीचे मतदान मिळवल्यास याचा फटका स्थानिक उमेदवारांना होऊ शकतो. पण विविध मुद्दे व पक्ष संघटना घडलेल्या घडामोडी यामुळे नेमके सध्याचे चित्र काय घडते. यावर निवडणूक निकाल अवलंबून राहणार आहे. त्यामुळे जरी छत्तीस गावाचं मताधिक्य महत्त्वाचं असलं तरी करमाळा तालुक्यातील मतदान हेच निर्णय ठरणार असल्याचे दिसून येत आहे.