करमाळासोलापूर जिल्हा

शिवसेनेत निष्ठावंता पेक्षा विरोधकांना छुपा पाठिंबा देणाऱ्यांची चलती ; शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता

प्रतिनिधी – 


करमाळा विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या कुर्डुवाडी नगरपरिषदेच्या हद्दीतील रस्त्यासाठी ७० कोटी रुपये निधी मंजुरीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर करमाळा तालुक्यातील शिवसैनिक आणि पदाधिकारी यांच्यात अस्वस्थता पसरली आहे. माढा तालुक्यात कुर्डुवाडी नगरपरिषद वगळता इतरत्र स्थानिक स्वराज्य संस्थात शिवसेनेची कोणतीही सत्ता नसताना क वर्ग नगरपरिषद असलेल्या कुर्डुवाडी वर श्रेष्टी एवढी मेहेरबान का ? असा प्रश्न विचारला जात आहे.

करमाळा विधानसभेच्या निवडणुकीत करमाळा तालुक्यातील जनतेने शिवसेनेच्या उमेदवाराला दोन वेळा विधानसभेवर पाठवले आहे. शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्यामध्ये सध्या तालुका पंचायत समिती शिवसेनेच्या ताब्यात आहे. सहा पैकी चार जिल्हा परिषद सदस्य निवडून दिले आहे. नुकत्याच रश्मी बागल यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने शिवसेनेची ताकद करमाळा नगरपालिकेत वाढली आहे. तर नारायण पाटील यांच्या माध्यमातून पंचायत समीती व जिल्हा परिषदेवर सदस्य आहेत.

माढा तालुक्यावर १९९६ पासून शिंदे बंधू निमगावकर यांचे एकतर्फी वर्चस्व आहे. आणि ते टिकवण्यासाठी शिवसेनेचे अदृश्य हात कार्यरत असल्याचे दबक्या आवाजात बोलले जाते. हा अदृश्य हात पूर्वी अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी अकलूजच्या वाऱ्या करत होता. आता थेट निमगावकर यांनी या अदृश्य हात असलेल्या पदाधिकाऱ्याला मॅनेज केल्यामुळे कुर्डुवाडी नगरपरिषद ताब्यात ठेवण्यासाठी विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये निमगावकरांनी सुचवलेले उमेदवार दिले जात असल्याची चर्चा आहे.

माढा तालुक्यातील आजपर्यंतच्या इतिहासात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात शिवसेनेकडून दिलेल्या उमेदवाराला बळीचा बकरा बनवण्यात आले आहे. हाच प्रकार विधानसभा उमेदवाराच्या बाबतीतही होत आला आहे. माढा तालुक्यातील ३६ गावे करमाळा विधानसभेला जोडली गेली आहेत. परंतु या ३६ गावातून अगदी कुर्डुवाडी नगरपरिषदेत शिवसेनेची सत्ता असताना अत्यंतअल्प प्रमाणात मतदान झाले आहे. असे असताना तुलनेत विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांना जास्त मतदान झाले आहे. यामागे छुपी व अर्थपूर्ण युती असल्याचे बोलले जाते.

गेल्या ७ वर्षात शिवसेना सत्तेत आहे. या काळात कुर्डुवाडी नगरपरिषद , पंचायत समितीच्या भव्य व सुसज्ज अशा इमारती अंतर्गत सजावटी सह उभारल्या गेल्या आहेत. तुलनेत सध्या शिवसेनेचे मुख्यमंत्री , नगरविकास मंत्री असताना करमाळा तालुक्याला ना निधी ना मानाचे पद मिळाले आहे. याउलट राष्ट्रवादी काँग्रेसच्या हितासाठी काम करणाऱ्या व केवळ कुर्डुवाडी नगरपरिषद यावर आयात उमेदवारांच्या आधारे सत्ता मिळवणाऱ्या पदाधिकाऱ्याला वारंवार संधी आणि निधी मिळत असल्याने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यात अस्वस्थता आहे.

करमाळा तालुक्यातील जनतेची विद्रोही जनता म्हणूनच ओळख आहे. सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँगेस व काँग्रेस अशी सत्तेतील सहभागी पक्ष आहेत. भविष्यात ही आघाडी अशीच राहिली आणि तर भाजपाचा एकमेव पर्याय करमाळा तालुक्यातील नेत्यांच्या व जनतेच्या समोर असणार आहे. आगामी नगरपरिषदा, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकातून याचा परिणाम दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE