धनुष्यबाणाला लाडक्या बहिणींची पसंती मिळाल्याची चर्चा ; नेमका बाण कोणाला टोचणार ?
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यात मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा महिलांच्या ८ हजार ८९५ मतांनी वाढ झालेली दिसून येत आहे. मागील निवडणुकांपेक्षा यावेळीच्या निवडणुकीमध्ये महिलांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. यामध्ये लाडकी बहिण योजना अग्रस्थानी ठेवत महिलांनी मतदान केल्याने टक्का वाढल्याचे बोलले जात आहे. त्यातच या निवडणुकीत शिंदे गटाकडून उभा असलेल्या दिग्विजय बागल यांच्या धनुष्यबाणाला मोठ्या प्रमाणावर पसंती मिळाल्याची चर्चा आहे. त्यामुळे नेमका बाण कोणाला टोचणार का स्वतःच अव्वल येणार आता या चर्चा जोर धरू लागल्या आहेत.
२०१९ च्या निवडणुकांमध्ये झालेल्या मतदानामध्ये महिलांच्या ९६ हजार ९५८ इतके मतदान झाले होते. तर यंदाच्या निवडणुकीत लाडकी बहीण या योजनांचा इतका प्रसार व प्रचार झाला की प्रत्येकाच्या तोंडी केवळ लाडकी बहीण योजना व त्याचे आलेले पैसे असल्याचे दिसून येत होते. ग्रामीण भागात शेतीमध्ये जाणारी महिला असो किंवा शहर ठिकाणी गृहिणी असो प्रत्येकाच्या तोंडी लाडकी बहीण योजनेचे आलेली रक्कम व त्यामधून मिळणारा आनंद दिसून येत होता. त्याचाच प्रत्यय यंदाच्या निवडणुकीतही आलेला दिसून आला आहे. मतदानाला जातान बहुतांश महिलांच्या तोंडी लाडली बहिण उल्लेख होता.
निवडणुकांपूर्वी थोडासा मागे पडलेला बागल गट तसेच शिवसेना या निवडणुकीत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून थोडीशी वेगवान धावताना दिसून आली. प्रत्येक गावातून शिवसेनेला मतदान होताना दिसून आले आहे. याचा फायदा दिग्विजय बागल यांना झालेला आहे. त्यामुळेच आता तिसऱ्या क्रमांकावर जाऊन फेकलेला बागलगट आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यामुळे तालुक्यातील कोणत्या गटाला याचा धोका होतो की स्वतःच अव्व्ल येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यंदाच्या निवडणुकीत एक लाख ५ हजार ८५३ मते ही केवळ महिलांची आहेत. त्यामुळे याचा निवडणुकीत कोणत्या बाजूला झुकतं माप दिलं जातंय यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून राहू शकतो.
नेमका फटका कोणाला ?
महायुती मधून उभा असलेल्या दिग्विजय बागल यांना लाडकी बहीण योजनेची मते मिळाल्यानंतर तालुक्यात पाटील व बागल यांच्य मतात विभाजन होताना दिसणार आहे. तर संजयमामा शिंदे यांना विद्यमान आमदार असताना अजितदादांनी केलेले सहकार्य व अजितदादा यांच्या पाठिंबा जरी असला तरी अपक्ष असल्याने त्यांना लाडकी बहीण योजना अपेक्षित असा फायदा होणार नाही. तेच मतदान हे दिग्विजय बागल यांच्या बाजूला वळाल्याने शिंदेनाही याचा फटका बसू शकतो. म्हणजेच नेमके तालुक्यातील मतांचा विभाजनाच्या हेतूने किंवा लाडकी बहीण मतदानाच्या टक्का बागल यांना वाढल्याने याचा फटका नेमका शिंदे किंवा पाटील यांना सोसावा लागेल हे सांगणे सध्या कठीण आहे.