श्री. आदिनाथ स. सा. निवडणूक – सकाळी अकराला आक्षेप, दुपारी दोनला सुनावणी निकालाला वाजले रात्रीचे नऊ
श्री. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या संपुर्ण २७२ उमेदवारांचे अर्ज मंजूर झाले आहेत. तर छाननी वेळी सहकारी संस्था व बिगर ऊस उत्पादक गटातील दोन अर्जांवर आक्षेप आला होता. त्यातील एक निर्णय दुपारीच सांगितला मात्र दुसऱ्यावर बराच काळ चर्चा व दोन्ही बाजुची कैफियत ऐकुन सायंकाळी उशीरा निर्णय दिला आहे. छाननी प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी अमोलसिंह भोसले व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा ठोकडे यांनी काम पाहिले.
श्री. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी २७२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्याची सुनावणी तहसील कार्यालयाच्या आवारात सकाळी ११ वाजता झाली. ऊस गाळपाची अट शिथिल झाल्याने सर्वांनाच दिलासा मिळाला. अर्जांवर कोणीही आक्षेप घेतले नाहीत. मात्र माजी आमदार संजयमामा शिंदे गटाचे संस्था गटातील सुजित बागल व शारदा मोरे यांच्या सहकारी संस्था व बिगर ऊस उत्पादक गटातील अर्जांवर आमदार नारायण पाटील व माजी आमदार जयवंतराव जगताप गटाचे डॉ. हरिदास केवारे यांच्या सुचकांच्या वतीने आक्षेप घेतला होता. त्यामध्ये मोरे यांच्या सुचकाचे नाव चुकल्याचे निदर्शनास आणुन दिले पण तो आक्षेप ग्राह्य धरण्यात आला नाही आणि मोरे यांच्या बाजुने निर्णय देत अर्ज मंजुर केला.

तर दुसऱ्या आक्षेपात सुजित बागल यांनी संस्था प्रतिनिधी मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या अर्जात नमूद असलेले अनुमोदक विकास गायकवाड यांचे नाव अंतिम मतदार यादीत दिसून येत नाही असा आक्षेप होता. याशिवाय स्वतः किंवा संस्थेचा प्रतिनिधी म्हणून पाच वर्षात एकही वेळा सर्वसाधारण सभेत उपस्थित नाहीत असा आक्षेप घेण्यात आला होता. त्यावर सायंकाळी उशिरापर्यंत निकाल राखून ठेवण्यात आला होता.
सदरचा अर्ज हा वैध असल्याचे घोषित करत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सुजित बागल यांना दिलासा दिला आहे. सदर प्रक्रियेत सुजित बागल हे क्रियाशील सभासद नाहीत संस्थेच्या कोणत्याही सर्वसाधारण सभेत उपस्थित नाही त्याबाबत संस्थेच्या पोट नियम सतरा ब नुसार नामनिर्देशन पत्र अपात्र होत आहेत ही मागणी वस्तुस्थितीला व दिलेल्या कायदेशीर तरतुदींची विसंगत आहे असे मत मांडण्यात आले आहे. तर विकास गायकवाड हे अनुमोदक असून आधार कार्ड वरील नावात फरक असल्याने दोन्ही व्यक्ती एकाच नावाचे असल्याचे दिसून आले. त्यामुळे सुजित बागल यांचा अर्ज वैध ठरवण्यात आला आहे.
