बांधकाम विभागाचे दुर्लक्ष – मोठी हानी टळली ; वादळी वाऱ्याने ढाच्या कोसळला
करमाळा समाचार
काल शहरामध्ये जोराचा वारा सुटला वादळी वाऱ्यामुळे शहरातील तसेच ग्रामीण भागात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर घरावरचे पत्रे उडून धोकाही निर्माण झाला होता. याच दरम्यान कायम प्रकाशझोतात राहिलेला देवीचामाळ चौकातील पुलावर अर्धवट ढाच्याही कोसळल्याचे दिसून आले. सुदैवाने या ठिकाणी कोणालाही इजा झाली नसली तरी बांधकाम विभागाचे दुर्लक्ष या मध्ये असल्याचे दिसून येत आहे.

अहिल्यानगर (अहमदनगर) टेंभुर्णी महामार्गावरील देवीचामाळ बायपास चौकामध्ये रखडलेल्या कामामुळे प्लाऊड व लोखंडी साहित्य लटकलेल्या अवस्थेत बऱ्याच दिवसांपासून आहे. या ठिकाणी वारंवार समाज माध्यमे तसेच प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून धोका असल्याबाबत बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या. संबंधित अधिकाऱ्यांना सूचनाही देण्यात आल्या. पण आज तागायत त्याकडे प्रशासनाने डोळे झाक केली.

परंतु काल झालेल्या वादळात मोठी हानी टळली आहे. या ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे सदर ठिकाणचे लोखंडी साहित्य तसेच प्लाऊड खाली पडले. त्यामुळे बाह्य वळण रस्त्यावरून जाणारी वाहतूक विस्कळीत झाली सुदैवाने कोणत्याही गाडीवर किंवा वाटसरुवर या ठिकाणी सदरचे वस्तू व साहित्य पडल्या नाहीत त्यामुळे कोणतीही हानी झाली नसली तरी अशा प्रकारच्या बाबींकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाला जाग कधी येणार हा मोठा प्रश्न आहे.
काल झालेल्या वादळानंतर त्या ठिकाणी पडलेले साहित्य अद्यापही उचलण्यात आले नाहीत. शिवाय यापुढे असा धोका होऊ नये म्हणून प्रशासन काही काळजी घेणार आहे का ? पुन्हा अशी घटना घडुन कोणते नुकसान झाल्यास याला जबाबदार कोण ? अजूनही प्रशासनाने तांत्रिक अडचणी न सांगता संबंधित ठिकाणी असलेल्या अडचणीच्या साहित्याला हटवणे गरजेचे आहे.