करमाळासाहित्य

मामांच्या धडाडीने आम जनता खुशीत मश्गुल, विरोधकांच्या बत्त्या मात्र गुल..!


संजयमामा आमदार झाल्यापासून त्याआधी मामा बाहेरचा,परका उमेदवार अशी सतत सुरू असलेली विरोधकांची कोल्हेकुई कायमची बंद पडलेली तर आहेच पण कोरोना-कोव्हिड सारख्या राष्ट्रीय-जागतिक पातळीवरील अभूतपूर्व संकटाला आपला देश,आपला महाराष्ट्र व आपला मतदारसंघ तोंड देत असताना सर्व काही विस्कळीत झालेलं असताना देखील संजयमामांनी गेल्या दोन वर्षांत सर्वच पातळ्यांवर दाखविलेली आपल्या नेतृत्व-कार्यगुणांची चुणूक पाहून आम जनतेला योग्य व्यक्तीची निवड केल्याची खातरजमा झाली असून त्यामुळे जनता आता मामांच्या धडाडीमुळे खुशीत असून विरोधकांच्या बत्त्या मात्र गुल झालेल्या आहेत आणि येत्या काळात या बत्त्या कायमच्याच मोडीत निघतील याची खात्री आता जनतेलाच पटली असल्याचे दिसून येते आहे.

वर्षानुवर्षे रेंगाळलेल्या व रोजगार निर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मांगी एमआयडीसी च्या कामाला उद्योगमंत्र्यांकडून मिळविलेला ग्रीन सिग्नल,सीना-कोळेगाव प्रकल्पातून करमाळा तालुक्यातील गोंउडरे,नेरले तलावात उपसा सिंचन पध्दतीने येणाऱ्या पाणी पुरवठ्याची देखभाल, दुरुस्ती व थकित वीजबिलामुळे धुळ खात बंद पडलेली योजना कार्यान्वित करणे आमदार निधीचा पुरेपूर वापर करणाऱ्या आमदारांमध्ये प्राधान्यक्रम मिळविणे आदी कामांमुळे मामांनी गेला आठवडा अक्षरशः गाजवला आहे.

संजयमामा आमदार झाल्यानंतर अवघ्या चारपाच महिन्यानंतर कोरोना-कोव्हिडचे भीषण संकट उद्भभवल्यानंतर आता जवळपास एकोणीस-वीस महिने उलटले तरीही हे सावट अद्याप दूर झालेले नाही मात्र या संकटकाळातदेखील कोव्हिड सेंटर्स,वाॅर्ड्स,ऑक्सिजन व लस पुरवठा,करमाळा शासकीय उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लॅन्ट उभारणी,सिझेरियन ऑपरेशन सुविधा,या रुग्णालयासाठी नवीन अॅम्ब्युलन्सची सुविधा आदी आरोग्यसेवा व आरोग्यसुविधा तालुक्यातील जनतेला मिळवून देण्याकामी मामांनी आपल्या नेतृत्वाचा “कस” सिध्द केला हे नाकारण्याचा करंटेपणा निदान आता तरी विरोधक करतील असे वाटत नाही.

आणि एकीकडे कोरोना-कोव्हिडशी मुकाबला करण्यासाठी शासकीय पातळीवरून खंबीरपणे उपाययोजना करत असताना त्याचवेळी दहीगाव,कुकडी या योजनांच्या पाण्याची आवर्तने रोटेशननुसार नियमितपणे मिळवून देऊन मामांनी आपल्या कार्यशैलीद्वारे जनतेने केलेली निवड सार्थ असल्याचे सिध्द करून दाखविलेले आहे हे विरोधक वा त्यांचे प्रवक्ते नामक भाट नाकारू शकणार आहेत का? दहीगाव उपसा सिंचन योजनेचे भूमीपूजन 1997 साली झाले आणि त्याचदरम्यान माढा तालुक्यासाठी भूमीपूजन झालेल्या भिमा-सिना जोडकालवा(बोगदा) व सिना-माढा सिंचन योजना या सुरू होऊन जवळपास वीस वर्षे उलटली पण केवळ राजकीय इच्छाशक्ती व ताकदीच्या आणि विकासाच्या दृष्टीच्या अभावामुळे रखडलेली दहीगावची योजना सुरू व्हायला जवळपास वीस वर्षे जावी लागली.

दहीगाव योजना सुरू झाली आणि तालुक्याच्या सुदैवाने त्याच दरम्यान मामा आमदार झाले आणि कोरोना च्या भीषण संकटाला तोंड देण्यासाठी सर्वच शासकीय योजना व विभागांचा निधी शासनाने कोरोना-कोव्हिडच्या निवारणासाठी वर्ग केला असताना अशा टंचाईच्या काळात देखील या योजनेची पाणी आवर्तने लाभधारक शेतकऱ्यांना नियमित व सुरळीत मिळण्यासाठी आजवर एकदा नव्हे तर तीनदा या योजनेचे लाखो रूपयांचे थकित वीजबिल शासनाला भरायला लावून आपल्या नेतृत्वाची धमक दाखवून दिली आहे.त्याचबरोबर या योजनेसाठी संपादित करण्यात आलेल्या शेतजमिनींची वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली नुकसानभरपाई वा मावेजा प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना पुरेपूर मिळवून देण्याचे काम प्राधान्याने पूर्ण केलेले आहे.आणि कुकडी कालव्यांसाठी पंचवीस वर्षांपूर्वी संपादित करण्यात आलेल्या व आत्तापर्यंत ना मोबदला ना धड नियमित व पुरेसे पाणी! अशी अवस्था असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनींचा मोबदला मिळण्यासाठी मामांच्या आग्रही भूमिकेमुळे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी संपादित करण्यात आलेल्या जमिनींच्या सर्वेक्षण व मूल्यनिश्चितीचे तातडीचे आदेश कुकडी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना दिलेले आहेत.

तर यानिमित्ताने आता प्रश्न हा उभा राहतो की वर्षानुवर्षे रेंगाळलेल्या या प्रश्नांची सोडवणूक ही त्या-त्या वेळेस मतदारांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना का करता आली नाही? आणि ही वस्तुस्थिती असताना आजदेखील ही मंडळी पाणीदार,दमदार,स्वाभिमानी नेतृत्व वगैरे-वगैरे अशा ‘ स्वयंघोषित ‘ पदव्या लावून कशासाठी मिरवत आहेत?
दहीगाव योजनेला ‘ ड्रीम-प्रोजेक्ट ‘ म्हणणार्‍या, वेगवेगळ्या भूलथापा मारून काही काळ जनतेला नादी लावणार्‍या ‘ स्वयंघोषित ‘ स्वाभिमानी नेतृत्वाला तर मागील निवडणुकीत मतदारांनी मतपेटीद्वारे जागा दाखवून कायमचं,केवळ आणि केवळ ” स्वप्नरंजन ” करण्यासाठी मुक्त केलेलं आहे.😅 आणि दुसर्‍या नेतृत्वाच्या कार्यकर्तृत्वाविषयी तर काय वर्णावे? त्यांची ख्याती सर्वदूर पूर्वापार पसरलेली आहे.😷संजयमामांचे नेतृत्व हे तालुक्यातील जनतेच्या दृष्टीने स्थानिक व आता तर सर्वाधिक हक्काचे आहे हे जनतेने त्यांना आमदार करून दाखवून दिलेले आहेच पण मतदारसंघाची पुनर्रचना होण्यापूर्वीच्या मूळ करमाळा तालुक्यातील असलेल्या आधीच्या नेतेमंडळींनी दुसर्‍यांनी उभारलेल्या संस्था लाटणे व लाटलेल्या संस्थांची स्वस्वार्थासाठी व सत्तेसाठी वाट लावणे आणि या संस्थांवर उपजीविका अवलंबून असलेल्या शेकडो,हजारो कुटुंबांचे संसार देशोधडीला लावणे असले उद्योग केल्यानेच जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे.

याचे ठळक उदाहरण म्हणजे आदिनाथ व मकाई कारखान्यांचे देता येईल.सहकारी असलेल्या व शेतकऱ्यांच्या मालकीच्या असलेल्या या सुरूवातीच्या काळात उत्तम स्थितीत असलेल्या या कारखान्यांची वाट कोणी आणि कशी लावली हे तालुक्यातल्या येड्या-गबाळ्याला देखील ठाऊक आहे! अशी सगळी पुण्याई पाठीशी असताना सुजाण जनता यांना पुन्हा संधी देईल असं जर कोणाला वाटत असेल तर ते मुर्खांच्या नंदनवनात वावरत आहेत असेच म्हणावे लागेल! मामा आमदार होण्याआधीच्या काळात रोडकिंग, कार्यसम्राट,जनतेच्या आमदार व आता जनतेचे आमदार असे बरेच नवीनच शब्दप्रयोग वाचायला मिळू लागले होते व अजूनही ते सुरू आहे. पूर्वी रोडरोमियो हा शब्द माहित होता पण रोड-किंग या शब्दाची टोटल अजूनही लागत नाही.कारण किंग म्हणजे राजा…मग तो रस्त्यावर कसा? आणि जर रस्त्यावरचा असेल तर मग भिकारी नसून राजा कसा  तसंच त्या जनतेचा आमदार या शब्दाबद्दल होतय.जर पडलेला उमेदवार हा जनतेचा आमदार असेल तर मग निवडून आलेला आमदार हा कोणाचा?  असो…ज्याचं तेच जाणोत ! आपली फक्त शंका इतकंच.

मामा आमदार झाल्यानंतर आतापर्यंतच्या दोन वर्षातलं दीड एक वर्ष तर कोरोना-कोव्हिडच्या विरोधात सर्वांच्याच दृष्टीने जगण्याचा लढा देण्यातच गेलं तरीही या आणीबाणीच्या काळात दहीगाव,कुकडीच्या पाण्याचे योग्य नियोजन,नियमित व पुरेसे पाणी आवर्तन,जमीन मोबदल्याची तातडीने मार्गी लागलेली कामे आणि आता सीना-कोळेगाव प्रकल्पातून उपसा सिंचनाद्वारे सुरू झालेले पाणी यामुळे या योजनांवर अवलंबून असणाऱ्या शेकडो-हजारो शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे.पूर्वी कधीतरी आणि काहीवेळा तर अतिपावसामुळे ओव्हरफ्लो चे पाणी कुकडी कालव्यात व मांगी तलावात आले तरी पाणीपूजन,त्याचे फोटोसेशन,पेपरबाजी आणि बातमी येईपर्यंत पाणी गायब! अशी सगळी ड्रामेबाजी करमाळेकरांनी पाहिलेली आहे.आणि आता मामा आमदार झाल्यापासून पहायला मिळतोय तो फक्त लोकोपयोगी कामांचा सुरू असलेला धडाका आणि तोही विदाऊट ड्रामेबाजी !

मुळातच उद्यमशील वृत्ती व विकासाची दृष्टी असलेल्या मामांच्या नेतृत्वाचे आणखी एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे मामा काम घेवून येणारी व्यक्ती अथवा कार्यकर्ता हा कोणत्या गटाचा,पार्टीचा आहे,आपला आहे की तपला आहे असलं काही पाहण्याची संकुचित वृत्ती मामांकडे नाही.आणलेले काम योग्य असेल किंवा ते सार्वजनिक हिताचे असेल तर ते कोणी आणले याकडे लक्ष न देता ते काम पूर्ण करण्याकडे मामांचे लक्ष असते.करमाळा तालुक्याच्या व एकूणच मतदारसंघाच्या समग्रलक्षी विकासाचा ध्यास घेतलेल्या संजयमामांच्या सर्वसमावेशक,अभ्यासू व डोळस नेतृत्वाखाली नजीकच्या काळात आजवरचा सर्व तऱ्हेचा अनुशेष भरून निघेल आणि सर्वच क्षेत्रात हा तालुका अग्रेसर ठरून सुजलाम-सुफलाम होईल याची आता खात्री जनतेलाच पटलेली आहे !
यानिमित्ताने तूर्त इतकेच!
विवेक शं.येवले
२५ ऑक्टोबर २०२१

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE