मकाई सहकारी साखर कारखान्यावर कामगारांचे ठिय्या आंदोलन
करमाळा समाचार
थकीत पगारासाठी मकाई सहकारी साखर कारखान्यावर कारखान्याच्या कामगारांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी बहुसंख्येने कामगार सहभागी झाले होते. आपल्या न्याय मागण्यांसाठी सकाळी आठ वाजलेपासून कारखान्याच्या गेट समोर धरणा दिला.

दरम्यान कारखान्याचे संचालक बाळासाहेब पांढरे , एम.डी. दळवी व जनरल सेक्रेटरी खाटमोडे हे आले व कामगारांसोबत त्यांच्या मागण्यांविषयी चर्चा करण्यात आली. यामध्ये सुरुवातीला कामगारांनी आपली शंभर टक्के पगार मिळण्याची मागणी लावून धरली व कामगार व प्रशासन यांच्यामध्ये बराच वेळ चर्चा झाल्यानंतर कामगारांनी कारखान्याच्या हिताच्या दृष्टीने विचार करून आपली १०० टक्के एक रकमी पगार मिळावा ही मागणी मागे घेत ६० टक्के एक रकमी पगार व उर्वरित ४० टक्के पगार प्रत्येक महिन्याच्या पगाराबरोबर एक मागील पगार या स्वरूपात द्यावी अशी मागणी मांडली. परंतु कारखान्याचे प्रशासन मात्र २० टक्क्यावरून फक्त पाच टक्के वाढ करून २५ टक्के वरती ठाम राहिले व बाकी ७५ टक्के पगाराबद्दल एक शब्द काढण्यास तयार नाहीत असे कामगारांचे म्हणणे आले.

कामगार आपला एक रुपया सोडण्यास तयार नाहीत अर्थात त्यांनी आपली भूमिका लवचिक ठेवून कारखान्याच्या हिताच्या दृष्टीने काम करण्याची तयारी दर्शवली परंतु प्रशासनाच्या ताठर भूमिकेपुढे चर्चा विफल झाली व कारखाना प्रशासनाच्या वतीने बोर्ड मिटिंग मध्ये कर्मचाऱ्यांची मागणी मांडून निर्णय कळण्याबाबत कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले. येत्या सात दिवसात मीटिंग घेऊन आपणास कळवतो त्या मिटींगला आपण या असे सांगितले. यावेळी कारखान्यातील कामगारांनी आपली भूमिका आक्रमकपणे मांडली. यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने सुरक्षा बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.